मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चेंबूरमध्ये अशोक स्तंभाचे लोकार्पण
By मनोहर कुंभेजकर | Published: April 14, 2023 02:03 PM2023-04-14T14:03:06+5:302023-04-14T14:03:20+5:30
डॉ. आंबेडकर जयंती निमित्त चेंबूरवासीयांना अनोखी भेट, खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्याला यश
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारताच्या सार्वभौमत्वाचे राष्ट्रीय प्रतीक असलेला अशोक स्तंभ सुमारे १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर उभारण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने काल रात्री ११ वाजता या अशोक स्तंभाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार चंद्रकांत हांडोरे, विश्वभूषण भारतरत्न प्रतिष्ठानचे सुनील रामराजे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
पूर्व उपनगरातील चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ही आंबेडकरी अनुयायांसाठी जिव्हाळ्याची आणि श्रध्देची बाब आहे. देशभरातील आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान असलेल्या दादरच्या चैत्यभूमी येथे उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाप्रमाणे, चेंबूरच्या डॉ. आंबेडकर उद्यान समोर देखील अशोक स्तंभ उभारावा, अशी स्थानिकांची आणि आंबेडकरी अनुयायांची मागणी होती. यानुसार सुमारे २००८ साली याठिकाणी अशोक स्तंभ उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, काही कारणास्तव मागील १३ वर्षे हे काम रखडले. मात्र, खासदार राहुल शेवाळे यांनी सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा करून अखेर हे काम पूर्णत्वास नेले.