Join us

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते भारत रंग महोत्सवाचे उद्घाटन

By संजय घावरे | Published: February 02, 2024 6:56 PM

परेश रावल, रघुबीर यादव यांच्या उपस्थितीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा महोत्सव सुरू

मुंबई : जगातील सर्वात मोठा थिएटर फेस्टिव्हल असलेल्या भारत रंग महोत्सवाला मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम रमेश बैस यांच्या हस्ते भारत रंग महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

एनसीपीएमध्ये संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळ्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे (एनएसडी) अध्यक्ष परेश रावल यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते रघुबीर यादव उपस्थित होते. उद्घाटनानंतर बहुप्रतिक्षित कार्यक्रमाची सुरुवात झाली. २१ फेब्रुवारीपर्यंत या महोत्सवात देशातील १५ शहरांमध्ये १५० हून अधिक विभागांतील परफॉर्मन्स सादर करण्यात येणार आहेत. हा महोत्सव मनमोहक नाट्य सादरीकरणांव्यतिरिक्त, विविध कार्यशाळा, चर्चा आणि मास्टर क्लासेसची जणू पर्वणीच ठरणार आहे.

या वेळी राज्यपाल महामहिम रमेश बैस म्हणाले की, भारत रंग महोत्सव हा सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परफॉर्मिंग आर्ट्सच्या परिवर्तनात्मक प्रभावाचा पुरावा आहे. भारत रंग महोत्सव २०२४ मध्ये सादर झालेल्या संस्कृती आणि परंपरांच्या सिम्फनीमध्ये, 'वसुधैव कुटुंबकम, वंदे भारंगम' ही थीम एकतेचे शक्तिशाली गीत म्हणून प्रतिध्वनित होते. आपल्या राष्ट्राची व्याख्या करणाऱ्या विविधतेतील एकतेच्या भावनेला सामील करून विविध कलागुणांचे आणि परंपरांचे एकत्रीकरण पाहणे हा सन्मान असल्याचेही बैस म्हणाले. भारत रंग महोत्सवाच्या २५व्या वर्षाची सुरुवात कलात्मक उत्कृष्टता आणि सांस्कृतिक विविधतेबद्दलची आमची वचनबद्धता दर्शविणारी असल्याचे एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी म्हणाले.

या फेस्टिव्हलमध्ये विविध शैली आणि भाषांमधील सहा नाटके सादर केली जातील. याची सुरुवात चित्तरंजन त्रिपाठी दिग्दर्शित 'ताजमहल का टेंडर' या नाटकाने झाली. अजय शुक्ला लिखित हे नाटक एनएसडी रेपर्टरी कंपनीने सादर केले. वामन केंद्रे यांच्या 'गजब तिची अदा' या नाटकासह विविध प्रकारच्या निर्मिती या महोत्सवात सादर केल्या जातील. रंगपीठ थिएटर, मुंबईद्वारे, एनएसडी रेपर्टरी कंपनी, नवी दिल्ली द्वारे 'बाबूजी', पंचकोसी, दिल्ली द्वारे 'द झू स्टोरी', थिएटर फ्लेमिंगो, गोवा द्वारे 'तोडी मिल फॅन्टसी' आणि दर्पण, लखनौ द्वारे 'स्वाह' सादर होतील. हा महोत्सव मुंबई, पुणे, भुज, विजयवाडा, जोधपूर, दिब्रुगढ, भुवनेश्वर, पाटणा, रामनगर आणि श्रीनगर येथे होणार आहे. ६ फेब्रुवारीला मुक्ती कल्चरल हब येथे भव्य समारोप समारंभ होईल.

एनएसडीचे माजी विद्यार्थी अभिनेते पंकज त्रिपाठी यंदाच्या फेस्टिव्हलचे फेस्टिव्हल ॲम्बेसेडर आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार, गायक आणि एनएसडीचे माजी विद्यार्थी स्वानंद किरकिरे यांच्या कल्पनाशक्तीचा स्पर्श उत्सव गीताला लाभला आहे. या वर्षीच्या महोत्सवाची थीम ‘वसुधैव कुटुंबकम, वंदे भारंगम’ आहे. यंदा महोत्सवात एनएसडी ‘रंग हाट’ किंवा जागतिक थिएटर मार्केट होणार आहे.