विकासकामांच्या उद्घाटनाचा आज धडाका; कॉफी शॉप, वाचनालयाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 10:00 AM2024-10-13T10:00:33+5:302024-10-13T10:00:58+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दीपक केसरकर व मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

Inauguration of development works today; Includes coffee shop, library | विकासकामांच्या उद्घाटनाचा आज धडाका; कॉफी शॉप, वाचनालयाचा समावेश

विकासकामांच्या उद्घाटनाचा आज धडाका; कॉफी शॉप, वाचनालयाचा समावेश

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच काही नवीन कामांचे भूमिपूजन आज रविवारी पार पडणार आहे. हे कार्यक्रम अगोदर गुरुवारी होणार होते. मात्र, प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे हे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते.  मुंबई महापालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या विविध योजना राबविण्यात येत आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दीपक केसरकर व मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

प्रस्तावित लोकार्पण, शुभारंभ व भूमिपूजन होणाऱ्या कामांमध्ये अँटॉप हिल येथील जगन्नाथ शंकरशेट स्मारकाचे भूमिपूजन, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (दादर) येथील भागोजी शेठ कीर स्मारकाचे भूमिपूजन, ए ते डी विभागातील ‘पिंक टॉयलेट’चे लोकार्पण; मुंबई शहरामध्ये १४ ठिकाणी कॉफी शॉपसह आकांक्षी स्वच्छतागृहांचा शुभारंभ, दलित वस्तींमध्ये १० ठिकाणी वाचनालय व अभ्यासिका आणि फॅशन स्ट्रीटचा  कायापालट या कामांचा समावेश आहे. 

शाळांमध्ये टेरेस किचन गार्डन, सीसीटीव्ही कॅमेरे
महापालिकेच्या १०३ शाळांमधील टेरेस किचन गार्डन आणि शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पण ही करण्यात येणार आहे. 
त्याचबरोबर माहीम कोळीवाडा येथील समुद्र किनाऱ्यालगत विहार क्षेत्र (प्रॉमेनेड) व संरक्षक भिंत सुशोभीकरण तसेच अरुणकुमार वैद्य मार्गालगत पदपथ (माहीम ट्रॅफिक चौकी ते वांद्रे उदंचन केंद्रापर्यंत) सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. 
यासोबतच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन देखील यावेळी करण्यात येणार आहे.
 

Web Title: Inauguration of development works today; Includes coffee shop, library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.