मुंबई : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी मुंबईत दाखल झाले. आपल्या या दौऱ्यात राष्ट्रपती राजभवन येथील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन करतील. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देतील.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी विशेष विमानाने राष्ट्रपतींचे सपत्निक आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह प्रशासन आणि सेनादलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रपतींचा ताफा राजभवनात दाखल झाला. आज त्यांचा तेथे मुक्काम राहणार आहे.आज, शुक्रवारी, राष्ट्रपतींच्या हस्ते दरबार हॉलच्या उद्घाटन होईल; तर, शनिवारी रत्नागिरी दौऱ्यात राष्ट्रपती हे आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर येथे भेट देतील, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधला आहे. त्याची आसनक्षमता ७५० इतकी आहे. जुन्या हॉलची आसनक्षमता २२५ इतकी होती. जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्रदर्शन घडविणारी गॅलरी देण्यात आली आहे. नव्या दरबार हॉलचे बांधकाम २०१९ साली सुरू झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळे बांधकामाची गती मंदावली होती. डिसेंबर २०२१ मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.