Join us

शिंदे गटाकडून मुंबईत पहिल्या शाखेचं उद्धाटन; आदित्य अन् उद्धव ठाकरेंचे फोटो गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 2:14 PM

शिवसेनेचे शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्या मतदारसंघात मानखुर्द येथे शिंदे गटाच्या शाखेचे उद्धाटन केले आहे.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत सुरु असलेल्या शिंदे-ठाकरे संघर्षाला आता नवं वळण लागलं आहे. एकीकडे शिवसेना आमचीच असा दावा शिंदे गटाकडून सातत्याने केला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण प्रलंबित आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने प्रत्येक विभागात शाखा आणि दादर, ठाण्यात मध्यवर्ती कार्यालय म्हणजे प्रति शिवसेना भवन उभारण्याचं ठरवलं आहे. शिंदे गटाकडून आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता मुंबईत पहिल्या शाखेचे उद्धाटन करण्यात आले आहे.

शिवसेनेचे शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्या मतदारसंघात मानखुर्द येथे शिंदे गटाच्या शाखेचे उद्धाटन केले आहे. विशेष म्हणजे राहुल शेवाळेंनी उद्धाटन केलेल्या शाखेवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. या शाखेच्या बॅनरवरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो वगळण्यात आले आहेत. यावेळी राहुल शेवाळे म्हणाले की, मुंबईत शहरात हा पहिलाच वार्ड येतो. मुंबई शहरात इथूनच प्रवेश होतो. याठिकाणी पहिल्या शाखेचे उद्धाटन होतंय त्याचा आनंद आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा भगवा फडकवण्याचा संकल्प आमचा आहे. मुंबईतील प्रत्येक वार्डमध्ये शिवसेनेच्या अशा शाखा उभ्या राहतील असं त्यांनी सांगितले. 

खरी शिवसेना कुणाची?शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार, १२ खासदार गेले आहेत. त्याचसोबत नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटाला पाठिंबा देत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी बनवण्यात आली आहे. आम्ही खरी शिवसेना आहोत. आमच्याकडे बहुमत आहे असा दावा करत शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह आम्हाला मिळावं अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात खरी शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. मात्र स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता एकनाथ शिंदे यांनी दादर भागात प्रति शिवसेना भवन उभारत थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिले आहे.  

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेराहुल शेवाळे