PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 05:15 AM2024-10-06T05:15:26+5:302024-10-06T05:17:12+5:30
बीकेसी येथे मेट्रो ३ मार्गिकेवरील गाडीला हिरवा झेंडा दाखविला. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मेट्रो प्रवासादरम्यान पालिका शाळेतील मुलेही सहभागी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बहुप्रतीक्षित मेट्रो ३ मार्गिकेच्या बीकेसी ते आरे या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला, विद्यार्थी आणि कामगारांसोबत बीकेसी ते सांताक्रुझ असा मेट्रोतून प्रवासही केला. तसेच या प्रवासादरम्यान त्यांनी या विविध समाज घटकांशी संवाद साधला.
ठाण्यातील कासारवडवली येथील कार्यक्रमात मेट्रो ३ मार्गिकेसह अन्य अशा सुमारे ३२ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मोदी यांनी केले. बीकेसी येथे त्यांनी मेट्रो ३ मार्गिकेवरील गाडीला हिरवा झेंडा दाखविला. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मेट्रो प्रवासादरम्यान पालिका शाळेतील मुलेही सहभागी झाली होती.
श्रमिक, लाडक्या बहिणींशीही संवाद
मेट्रो मार्गिका उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमिकांसोबत एकाच आसनावर बसून त्यांनी प्रवासही केला. तसेच त्यांना कामाबाबत आपुलकीने विचारले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला.
मोबाइल तिकीट ॲपचे अनावरण
मोदी यांनी बीकेसी स्थानकातील कार्यक्रमात ‘मेट्रो कनेक्ट ३’ या मोबाइल तिकीट ॲपचे अनावरण केले. तसेच मेट्रो मार्गिकेच्या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी मेट्रो स्थानकाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
सोमवारपासून सेवा सुरू
कुलाबा ते आरे या ३३.५ किमी मार्गिकेपैकी पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी असा १२.६९ किमी लांबीचा मार्ग प्रवाशांच्या वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून ही मेट्रो मार्गिका सोमवारी, ७ ऑक्टोबरला सकाळी ११ पासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल केली जाणार आहे. मंगळवारी, ८ ऑक्टोबरपासून पहिल्या टप्प्यातील या मार्गावर सकाळी ६:३० ते रात्री १०:३० या वेळेत गाडी चालविली जाणार आहे. या मार्गावर प्रत्येक ६:४० मिनिटांच्या अंतराने गाडी चालविली जाणार आहे. दिवसभरात ९६ फेऱ्या मुंबईकरांना सेवा देतील. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) पहिल्या टप्प्यातील मार्गाच्या संचालनासाठी ९ गाड्या तयार ठेवल्या आहेत.