Join us  

कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा मुहूर्त चुकला! १९ फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते एका मार्गिकेचे लोकार्पण

By जयंत होवाळ | Published: February 16, 2024 8:05 PM

कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचे लोकार्पण रखडले

जयंत होवाळ/मुंबई : कोस्टल रोडची एक मार्गिका १९ फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी खुली होणार होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेचे लोकार्पण होणार होते.पण हा मुहूर्त चुकला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून नवी तारीख मिळाली नसल्याने पहिल्या टप्प्याचे लोकार्पण रखडणार असे दिसते.

प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या १०.५८ किमीच्या एकूण मार्गाचे सध्या ८५ टक्के काम पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्याचे लोकार्पण १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी २ फेब्रुवारी रोजी केली होती. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणात तीन लेनची एकच बाजू सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वरळीहून मरीन ड्राइव्ह येथे जाता येणार आहे.

हा मार्ग सकाळी ८ ते रात्री ८ असा केवळ बारा तासच सुरू राहणार आहे. उरलेल्या वेळेत कोस्टल रोडचा उत्तरेकडील मार्ग पूर्ण करण्याचे काम आणि कोस्टल रोडला वरळी आणि शिवडी सागरी सेतू जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. कोस्टल रोडच्या लोकार्पणाची तारीख अद्याप निश्चित नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. संपूर्ण कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने १५ मेपासून करणार असल्याचे पालिकेने याआधी जाहीर केले आहे.

टॅग्स :मुंबई