कांदिवलीत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे लोकार्पण
By मनोहर कुंभेजकर | Published: August 16, 2022 05:05 PM2022-08-16T17:05:44+5:302022-08-16T17:06:52+5:30
वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन. यावेळी विनोद तावडे म्हणाले, खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रत्येक कामाला संघर्ष करावा लागत असून जनतेला न्याय देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. मुंबईची जनता तुमच्या कार्याने तुम्हाला त्यांच्या हृदयात नेहमीच स्थान देईल.
मुंबई - देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज सकाळी भरपावसात कांदिवलीत लोकार्पण झाले. कांदिवली (पूर्व), आकुर्ली रोड, समता नगर पोलीस चौकीजवळील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उत्कृष्टता केंद्रच्या (सेंटर ऑफ एक्सलन्स) संकुलात हा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, मुंबई भाजपा अध्यक्ष,आमदार अँड.आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, स्थानिक आमदार अतुल भातखळकर, आमदार योगेश सागर, आमदार भाई गिरकर,आमदार सुनील राणे, आमदार मनिषा चौधरी, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आदी उपस्थितीत होते.
गेल्या शनिवारी (दि,13) दहिसर चेक नाक्यावरून दुपारी 3.30 वाजता वाजपेयी यांच्या पुतळ्याची वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात सजवलेल्या रथावरून हजारो भाजप कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. तर वाजपेयी यांचा पुतळा क्रेनवरून 7.30 च्या सुमारास सुरक्षित चबुतऱ्यांवर ठेवल्यावर येथे या पुतळ्याचे अनावरण झाले होते. आज त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण झाले.
वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन. यावेळी विनोद तावडे म्हणाले, खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रत्येक कामाला संघर्ष करावा लागत असून जनतेला न्याय देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. मुंबईची जनता तुमच्या कार्याने तुम्हाला त्यांच्या हृदयात नेहमीच स्थान देईल.
खासदार गोपाळ शेट्टी आपल्या मनोगतात म्हणाले, वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले असून त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाचे स्वप्न आपण पाहिले होते ते अखेर पूर्ण झाले. स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा पुतळा उभारण्यासाठी आपल्याला सर्वोच्य न्यायालयात लढा द्यावा लागला होता. तर वाजपेयी यांचा येथे पुतळा उभारण्यासाठी आपण दीड वर्षे लढा दिला. 14 परवानग्या मिळवूनसुद्धा तत्कालीन महाआघाडी सरकार आणि त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाजपेयी यांच्या पुतळ्याला परवानगी नाकारली होती. भारतरत्न वाजपेयी यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपण संसदेत त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव टाकला आहे. राज्यात सत्तांतर होताच वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाजपेयी यांच्या १८०० किलो वजनाचा आणि १४.५ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा येथे बसविण्यास तत्काळ परवानगी देऊन मार्ग मोकळा केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. .
अँड. आशिष शेलार म्हणाले, "भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा येथे बसवू न देण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले आहे. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी यांचे त्यांनी कौतुक केले. मुंबईतील जनतेच्या वतीने वाजपेयी यांना विनम्र अभिवादन करतांना त्यांनी वाजपेयी यांच्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला.
आजचा दिवस मुंबईच्या इतिहासात सुवर्ण दिवस असल्याचे उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल, जेष्ठ भाजप नेते राम नाईक यांनी सांगितले. खासदार शेट्टी यांचे अभिनंदन करून त्यांनी भव्य पुतळा उभारल्याबद्दल शिल्पकार उत्तम पाचारणे यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी वाजपेयी यांच्या अनेक आठवणी सांगितल्या.
यावेळी आमदार अतुल भातखळकर म्हणाले, माजी माविआ सरकारने घेतलेला भ्रष्ट निर्णय बदलून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची ही जमीन खासगी विकासकाला देण्याचा निर्णय रद्द करावा, तसेच या पुतळ्याचा समोरील आकुर्ली मेट्रो स्टेशनचे नाव बदलून ते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, असे नामकरण करावे. अशा दोन मागण्या आपण आगामी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत.
यावेळी युनूस खान, वास्तूविशारद विवेक भोळे, प्रवीण आंब्रे, अभियंता संजय आव्हाड, नितीन प्रधान, नरसिंहा, संतोष सिंग यांचा विनोद तावडे, राम नाईक, अँड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. जे. पी. मिश्रा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विलास भागवत, मुंबई भाजपा सचिव योगेश दुबे, विनोद शेलार, प्रकाश दरेकर, राणी द्विवेदी, सर्व माजी नगरसेवक, प्रकाश सारस्वत आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उत्तर मुंबई भाजप सरचिटणीस दिलीप पंडित यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तर भाजपचे स्थानिक अध्यक्ष आप्पा बेलवलकर यांनी आभार व्यक्त केले.