कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा घोळ संपला; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी होणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 11:37 AM2024-03-09T11:37:38+5:302024-03-09T11:38:32+5:30
डिलाईलरोड पूल आणि गोखले पूल या दोन्ही पुलांच्या उद्घाटनाचा घोळ ताजा असताना कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा नवा घोळ झाला होता.
मुंबई : डिलाईलरोड पूल आणि गोखले पूल या दोन्ही पुलांच्या उद्घाटनाचा घोळ ताजा असताना कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा नवा घोळ झाला होता. अखेर सोमवार, दि. ११ मार्च रोजी त्याचे लोकार्पण करण्याचे अखेर निश्चित झाले आहे कोस्टल रोडची एक मार्गिका शनिवारपासून सुरू केली जाणार होती, त्यासाठी निमंत्रण पत्रिकेचा मसुदाही तयार करण्यात आला होता. मात्र आता सोमवारी लोकार्पण होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते फेब्रुवारीत एका मार्गिकेचे लोकार्पण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता.
आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रण :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोस्टलची एक मार्गिका सुरू केली जाणार आहे. लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदे यांचीही नावे निमंत्रणपत्रिकेवर आहेत.
काळात विविध प्रकल्पांचे भूमिपूजन लोकार्पण यासाठी पंतप्रधान नवी मुंबईत आले होते. या भेटीच्या निमित्ताने कोस्टलचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न होता. मात्र तोपर्यंत काम पूर्ण झाले नसल्याने बेत बारगळला. त्यानंतरही लोकार्पणाविषयी प्रशासनाकडून ठोस सांगण्यात येत नव्हते. तारखेची अनौपचारिक घोषणा व्हायची, पण तिही हवेत विरून जायची. या पार्श्वभूमीवर या
आठवड्यात पुन्हा एकदा कोस्टलची चर्चा सुरू झाली. शनिवारी संध्याकाळी ४ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होईल, असे गुरुवारी सांगण्यात आले. निमंत्रणपत्रिकेचा मसुदाही तयार करण्यात आला. मात्र शनिवारी लोकार्पण होणार नाही, हे पालिकेकडून शुक्रवारी स्पष्ट झाले. याआधी डिलाईल रोड आणि गोखले पुलाच्या उद्घाटनाचा असाच घोळ घालण्यात आला होता. गोखले पुलाचे काम झाले असतानाही मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, म्हणून उद्घाटन पुढे ढकलले जात होते. काम अपुरे आहे, असे भासवण्यासाठी पुलावर मुद्दाम राडारोडा ठेवण्यात आला आहे, असा आरोप झाला होता.