मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आरोग्य सेवाप्रणालीवरील ओझे कमी करण्यासाठी आणि रुग्णांना उत्तम उपचार व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण रुग्णालयाने गोरेगाव येथे पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्लांट प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार कपिल पाटील, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, सचिन चव्हाण, युवराज मोहिते, समीर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी रुग्णालयाच्या वतीने कोविड काळात सेवा दिल्याबद्दल डॉक्टर तसेच परिचारिकांचा सन्मानचिन्ह देऊन जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, मी या उपक्रमाबद्दल सर्वांच्या वतीने श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण रुग्णालयाचे तसेच डॉ. सुनील चव्हाण आणि सचिन चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. ऑक्सिजनची कमतरता भासणाऱ्या रुग्णांसाठी हा प्रकल्प एक वरदान ठरणार आहे. रुग्णांना आता ऑक्सिजनच्या शोधात हॉस्पिटलच्या बाहेर धावावे लागणार नाही. अशा उपक्रमांमुळे आरोग्य सेवावरील ताण आता कमी होईल आणि ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या गंभीर रुग्णांना त्याची नक्कीच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फोटो ओळ - कोविडकाळात सेवा दिल्याबद्दल डॉक्टर तसेच परिचारिकांचा सन्मानचिन्ह देऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.