मुंबई : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबई विद्यापीठामध्ये गुरूवारी ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्याधारीत कौशल्य विकास सेतू’ या प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी केले. या प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तरुणांमध्ये कौशल्यविकास, सर्वांगिण विकास आणि अंगभूत गुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जाईल.या प्रकल्पाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टमसाठीसुध्दा हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबाबत कुलगुरु म्हणाले की, या प्रकल्पामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माहिती आणि ज्ञानाची दारे उघडली जातील. शिवाय समाजातील मागास घटकाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम आणि कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच जागतिक समस्यांचे स्थानिक पातळीवर निराकरण करणे, अंगभूत गुणांचा विकास करण्यावर प्रकल्पाच्या माध्यमातून भर दिला जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘कौशल्य विकास सेतू’ प्रकल्पाचे विद्यापीठात उद्घाटन
By admin | Published: October 16, 2015 3:20 AM