गोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 03:25 PM2018-08-14T15:25:28+5:302018-08-14T15:35:28+5:30
शिवसेनेपाठोपाठ भाजपाच्या राज्यमंत्र्यांनी केली आज पुलाच्या कामाची पहाणी
मनोहर कुंभेजकर
मुंबई - 15 ऑगस्ट देशाचा 72 वा स्वातंत्र्य दिन आहे. गोरेगाव विधानसभेतील सुमारे 3.50 लाख नागरिकांची येथील वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर गोरेगावचा वीर सावरकर विस्तारित उड्डाणपूल सुरू करा अशी भाजपाची आग्रही मागणी आहे. भाजपाचे प्रभाग क्रमांक 50 चे नगरसेवक दीपक ठाकूर यांनी लोकमतशी बोलताना याविषयी माहिती दिली. प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व टोपीवाला मंडईच्या गेल्या 23 जुलैच्या भूमिपूजन प्रसंगी जो प्रोटोकॉल महापालिकेने पाळला होता न पाळता या पुलाचे रितसर उदघाटन करा, महापालिकेला हवे त्या मान्यवरांना बोलवा मात्र या पुलाचे लोकार्पण उद्याच करा अशी ठाम आमची भूमिका नगरसेवक दीपक ठाकूर यांनी लोकमतकडे मांडली.
मंगळवारी दुपारी 12.15च्या सुमारास राज्याच्या महिला व बाल कल्याण राज्यमंत्री व गोरेगावच्या भाजपाच्या स्थानिक आमदार विद्या ठाकूर यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत या पुलाच्या कामाची पहाणी केली. यावेळी माजी उपमहापौर दिलीप पटेल, भाजपा सरचिटणीस जयप्रकाश ठाकूर, माजी नगरसेवक समीर देसाई, पी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष संदीप दिलीप पटेल, स्थानिक भाजपा नगरसेवक दीपक ठाकूर, भाजपा नगरसेवक हर्ष पटेल, भाजपा नगरसेविका राजुल देसाई, भाजपा नगरसेविका श्रीकला पिल्ले व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून आज रात्रीपर्यंत या पुलाचा स्टेबिलीटी रिपोर्ट येणार आहे. हा रिपोर्ट पालिका प्रशासनाला सादर केल्यावर आणि पालिका प्रशासनाने या पुलाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर लगेच हा पूल वाहतूकीसाठी खुला होणार आहे.
पुलाचे भूमिपूजन 26 जानेवारी 2015 ला झाले होते. त्यामुळे उद्याच्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहुर्तावर हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा आणि गोरेगावकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी अशी आग्रही मागणी प्रभाग समिती अध्यक्ष संदीप पटेल यांनी केली.या पुलावरून शिवसेना व भाजपात जोरदार श्रेय वादाची लढाई रंगली असल्याचे सविस्तर वृत्त लोकमतने सर्वप्रथम लोकमत ऑनलाईन आणि सोमवारी लोकमत वृत्तपत्रातून दिल्यावर लोकमतच्या वृत्ताचा शिवसेना, भाजपा, काँग्रेस व इतर राजकीय पक्ष आणि गोरेगावकरांमध्ये खूप चर्चा झाली होती. गोरेगाव पूर्व व पश्चिमेला 2000 साली बांधलेल्या पूर्वीच्या वीर सावरकर उड्डाण पुलावर येथील वाहतूक कोंडीतून गोरेगावकरांची मुक्तता होण्यासाठी आणि येथील एस.व्ही.रोडवरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने येथे 452 मीटर लांब व 11.50 मीटर रुंद असा वीर सावरकर विस्तारित उड्डाणपूल बांधला असून या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.
रविवारी संध्याकाळी शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू, स्थापत्य समिती अध्यक्ष साधना माने, नगरसेवक स्वप्नील टेबंवलकर आणि अन्य शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांसमवेत या पुलाची पालिका अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली होती. तर आज महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी या पुलाची भाजपा पदाधिकारी व येथील 5 भाजपा नगरसेवकांसमवेत पहाणी केली. त्यामुळे या पुलावरून शिवसेना व भाजपात श्रेयवाद रंगणार हे मात्र निश्चित.