मुंबई : लातूर जिल्ह्यातील अनुदानित तुकडीवर अखंडितपणे कार्यरत असलेल्या, १८३ प्राथमिक शिक्षकांचे वेतन गेली ४ वर्षे अनियमिततेच्या नावाखाली बंद करण्यात आले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आदेश दिल्यानंतरही शासन टाळाटाळ करत असल्याने, शिक्षकांनी आझाद मैदानात बेमुदत उपोषण पुकारले आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने पुकारलेल्या आंदोलनाकडे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. उच्च न्यायालयाने संबंधित शिक्षकांच्या सेवा रुजू दिनांकापासून ग्राह्य धरून, वेतन देण्याबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश दिले होते. तरीही शासनाने सर्व तुकड्या स्वयंअर्थसहाय्यित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, संबंधित शिक्षकांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्याची दखल घेत, शिक्षणमंत्र्यांनी वेतनाचा प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आश्वासित केल्याने उपोषण मागे घेतले. मात्र, तीन महिन्यांनीही प्रश्न मार्गी लागला नसल्याने, शिक्षकांनी पुन्हा बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
लातूर जिल्ह्यातील अनुदानित तुकडीवर कार्यरत असलेल्या शिक्षकांचं वेतनासाठी बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 6:07 AM