मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे होणारी पडझड सुरूच असून, गुरुवारी सायंकाळी काळबादेवीमधील दोन माळ्याच्या इमारतीचा काही भाग पडला. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसून, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. शहरात १० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या असून, एकूण २७ ठिकाणी झाडे पडली.मंगळवारच्या तुलनेत बुधवारसह गुरुवारी मुंबई आणि उपनगरात कोसळणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी असले तरीदेखील अधून-मधून पडणाऱ्या सरींदरम्यान पडझडींच्या घटना सुरूच आहेत. काळबादेवीमध्ये सायंकाळी म्हाडाची मालमत्ता असलेल्या इमारतीच्या भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. तर शहरात १ आणि पूर्व उपनगरात १ अशा २ ठिकाणी घरांच्या प्लास्टरचा भाग पडल्याची घटना घडली. शहरात ५, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण १० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शिवाय शहरात ७, पूर्व उपनगरात ६ आणि पश्चिम उपनगरात १४ अशा एकूण २७ ठिकाणी झाडे पडली आहेत.स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि लगतच्या भागात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तसेच येत्या ४८ तासांत पुन्हा पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)
शहरात मुसळधार पावसामुळे पडझड सुरूच!
By admin | Published: July 24, 2015 2:17 AM