जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप
By admin | Published: February 28, 2015 11:02 PM2015-02-28T23:02:25+5:302015-02-28T23:02:25+5:30
जिल्ह्यात शनिवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाची रिपरिप आणि रिमझिम पाहण्यास मिळाली. सकाळपासूनच ढगाळ हवामानामुळे वातावरणात दिवसभर सर्वत्र गारवा जाणवत होता.
ठाणे : जिल्ह्यात शनिवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाची रिपरिप आणि रिमझिम पाहण्यास मिळाली. सकाळपासूनच ढगाळ हवामानामुळे वातावरणात दिवसभर सर्वत्र गारवा जाणवत होता. पावसाने लग्न आणि साखरपुडा समारंभामध्ये खो घातला. तसेच शेतकरी, बागायतदार आणि वीटभट्टी व्यावसायिकांमध्ये आपले नुकसान तर होणार नाही ना, अशी भीती होती. शहरी भागात रस्ते ओलसर झाले होते. त्यामुळे रस्त्यांवरून भरधाव वेगाने जाणारे काही दुचाकीस्वार घसरल्याचा काही घडल्या. तसेच एकीकडे स्वाइन फ्लू आजार पसरत असताना आज पडलेला पाऊस जणू साथीच्या आजारांना आमंत्रण देणारा ठरू नये, असेही बोलले जात आहे.
अधिक वृत्त /३
चाकरमान्यांची तारांबळ
कल्याण : सकाळपासूनच आकाश ढगाळ होते. वातावरणातही काहीसा गारवा पसरला होता. दुपारी १ ते ३ या वेळेत पाऊस झाला. रिमझिम सुरू झाल्याने छत्र्यांचे दर्शन झाले. यामुळे चाकरमान्यांची तारांबळ उघडल्याचे दिसून आले.
शेतीला फटका
डोळखांब : तालुक्यातील बहुतांश शेतकरी रब्बी हंगामात भाजीपाला लागवड करत असतात. आठवड्यापासून असलेले ढगाळ वातावरण व शनिवारी आलेल्या अवकाळी पावसाने भाजीपाल्यावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. भेंडी, चवळी, घोसाळी, मिरची, दुधी, कारले यासाख्या भाजीपाल्याची लागवड रब्बी हंगामात होते. पण, सतत दोन वर्षांपासून त्याला लहरी हवामान व अवेळी पावसाचा फटका बसत आहे. पदरमोडदेखील उत्पन्नातून मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे.
साथीचे आजार पसरण्याची भीती
भार्इंदर - मीरा-भार्इंदर शहरांत शनिवारी दु. ३ वा.च्या सुमारास अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासूनच वातावरणात मळभ आले होते. पावसाळी वातावरण तयार झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. शहरात अगोदरच स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असताना अवकाळी पावसाने बदल झालेल्या हवामानामुळे आणखी साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
वीटभट्टीचे नुकसान... चिकणघर : अचानकपणे सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. भाजणीआधी सुकण्यासाठी ठेवलेल्या छापलेल्या विटा भिजून वीटभट्टीवाल्यांचे नुकसान झाले. तसेच वांगी, गवार, दोडके, घोसाळे आणि काकडी यांचेही नुकसान झाल्याचे शेतकरी सुदाम जाधव यांनी सांगितले.
लग्नसराईवर विरजण... टिटवाळा : सकाळपासूनच वातावरणात बदल झाल्याने ढगाळ हवामान झाले होते. कधी ऊन तर कधी सावली, यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यात रिमझिम पावसानेदेखील हजेरी लावून लगीनसराईवर विरजण घातले. वातावरणातील बदल व दुपारी २ वाजल्यानंतर अचानक पावसाने रिपरिप करत आपली हजेरी लावली. यामुळे जनतेची धावपळ उडाली. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईवर याचा दुष्परिणाम झाला. तसेच वीटभट्टी व्यावसायिकांचेदेखील नुकसान झाले. इतर व्यावसायिकांनादेखील या अवेळी हजेरी लावलेल्या पावसाची झळ सोसावी लागली. या वातावरणामुळे लहान मुलांच्या आरोग्यावरदेखील परिणाम होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.