Join us

काँग्रेस प्रभारींनी घेतली नेत्यांची जोरदार हजेरी, महाराष्ट्रात काय बिघडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 08:18 IST

दर आठवड्याला अहवाल द्या। अन्य राज्यांत काँग्रेसकडे इनकमिंग, मग महाराष्ट्रात काय बिघडले?

अतुल कुलकर्णीमुंबई : देशभरात सगळीकडे काँग्रेसचे चित्र चांगले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर केलेली योजना गेम चेंजर ठरत आहे, सगळीकडे पक्षात इनकमिंग आहे. शत्रुघ्न सिन्हा भाजप सोडून पक्षात येत आहेत, मग महाराष्ट्रात असे काय घडले की, ही अवस्था व्हावी. हे चालणार नाही. दर सात दिवसाला कोण काम करत आहे, कोण नाही याचा अहवाल घेतला जाईल, अशा शब्दांत पक्षाचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणूगोपाल यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची जोरदार हजेरी घेतली.

आता जेथे काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत तेथे पक्षाच्या वतीने एक समन्वयक नेमला जाईल. त्याच्यासोबत राष्टÑवादीतर्फे एक समन्वयक घेतला जाईल. दोन्ही पक्षात काम करताना सुसुत्रता रहावी यासाठी हे केले जाईल. जिल्ह्यातील अडचणी सोडवण्याचे काम हे समन्वयक करतील. जर प्रश्न राज्य पातळीवर जाणार असतील तर पक्षाचे अतिरिक्त प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे त्याची माहिती दिली जाईल. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर देशातले चित्र बदललेले दिसेल. जे काम करणार नाहीत त्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दात वेणूगोपाल यांनी सुनावले. वेणूगोपाल हे पक्षात जनरल सेक्रेटरी आहेत पण ते राहुल गांधी यांच्या नजीकचे मानले जातात. अशा एका इंजेक्शनची गरज होती, अशा शब्दांत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.शनिवारी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुंबईत टिळक भवन येथे झाली. बैठकीला पक्षाचे प्रभारी मलिकार्जुन खरगे, अतिरिक्त प्रभारी मधुसूदन मिस्त्री, के. सी. वेणूगोपाल यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, मुकूल वासनिक, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, वॉर रुम प्रमुख सुरेश शेट्टी, हर्षवर्धन पाटील, राजीव सातव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. प्रत्येक मतदारसंघाचा यावेळी आढावा घेतला गेला. संपूर्ण बैठकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक शब्दही काढला नाही, असे समजते. मात्र आपण औरंगाबादची जबाबदारी घेतो, असे त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना सांगितल्याचे समजते, तर बाळासाहेब थोरात यांनी नगर आणि शिर्डी दोन्हीतून काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणतो, असा शब्द दिल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. खरगे हे स्वत:च्या मतदारसंघात निवडणुकीसाठी जातील, त्यामुळे आता मधुसूदन मिस्त्री पूर्णवेळ मुंबईत बसून राहतील, शिवाय वेणूगोपालही सतत आढावा घेत राहतील, असे यावेळी ठरले.राहुल गांधींच्या पाच एप्रिलला तीन सभा होणारपाच एप्रिल रोजी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या तीन सभांचे आयोजन केले जाईल. त्या दृष्टीने तारीख व सभांच्या वेळा निश्चित करण्याचे काम दोन दिवसांत दिल्लीत अंतीम होईल, असेही ठरले आहे. प्रियंका गांधी यांना महाराष्टÑात काही सभांसाठी आणा, अशी मागणी अनेक नेत्यांनी केली आहे. त्यांच्याही सभा घेण्यासाठी लवकरच निर्णय होईल, असे सांगण्यात आले.लोकसभा निवडणुकीनंतर देशातले चित्र बदललेले दिसेल. जे काम करणार नाहीत त्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दात जनरल सेक्रेटरी के. सी.वेणूगोपाल यांनी सुनावले.

टॅग्स :काँग्रेसराहुल गांधीअशोक चव्हाण