राज्यात तरुणींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण वाढते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:06 AM2021-04-21T04:06:39+5:302021-04-21T04:06:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक स्त्रियांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे, विदर्भात हे ...

The incidence of anemia among young women is increasing in the state | राज्यात तरुणींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण वाढते

राज्यात तरुणींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण वाढते

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक स्त्रियांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे, विदर्भात हे प्रमाण सर्वाधिक असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट आफ पाॅलिटिक्स अँड इकाेनाॅमिक्सच्या कौस्तव घोष आणि आगरतळा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आफ टेक्नोलॅजीच्या मिथुन माॅग या दोघांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील १५ ते ४९ वयोगटांतील स्त्रियांच्या आरोग्याचा अभ्यास केला. क्लिनिकल एपिडेमिओलॅजी अँड ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या दोघांच्या संशोधन अहवालात केंद्रीय आरोग्य विभागाच्या अहवालातील सांख्यिक माहितीचा वापर करण्यात आला आहे. रक्तक्षयाचे मुख्य कारण म्हणजे आहारात लोह, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी -१२ आणि प्रथिनाचा अभाव असणे होय.

अहवालानुसार, राज्यातील ५४.२ टक्के स्त्रियांना रक्ताक्षयाचा आजार आहे. २०१४-१५ च्या तुलनेत २०१९-२० दरम्यान या रक्ताक्षयाच्या प्रमाणात ६.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४-१५ च्या अहवालानुसार, नंदुरबार येथील ६०.२२ टक्के स्त्रियांना रक्तक्षय झाल्याचे समोर आले आहे, तर २०१९-२० साली गडचिरोली येथील ६६.२० टक्के स्त्रियांना रक्तक्षय झाल्याची नोंद आहे. राज्यात वाशिम जिल्ह्यात स्त्रियांना रक्तक्षय होण्याचे प्रमाण सर्वांत कमी असून हे प्रमाण ३५.४६ टक्के इतके आहे. पाच वर्षांपूर्वीही या जिल्ह्यात सर्वांत कमी रक्तक्षय असल्याची नोंद होती, त्यावेळी हे प्रमाण ४१.२० इतके होते.

राज्यात मागील पाच वर्षांत पाच जिल्ह्यांत रक्तक्षय होण्याचे प्रमाण कमी होत गेल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. त्यात मुंबई, मुंबई उपनगर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे, तर दुसरीकडे रक्तक्षयाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या जिल्ह्यांत गडचिरोली, जळगाव, वर्धा, धुळे, यवतमाळ, परभणी यांचा समावेश आहे.

* याचा सामना कसा करावा

महिलांना रक्तक्षयाचा विविध आघाड्यांवर सामना करावा लागतो. महिलांचे शिक्षण सुधारणे, स्त्रियांमध्ये तपासणी करणे, पौष्टिक समुपदेशन करणे, लोह, बी कॉम्प्लेक्स गोळ्या वितरित करणे आणि तळागाळातील बदलांची अंमलबजावणी करणे हे ॲनिमियाचा भार कमी करण्यासाठी आवश्यक आहे. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव, आययुडीमुळे होणारा रक्तस्रावामुळे रक्ताचे नियंत्रण. यासाठी महिलांनी स्त्रीरोगतज्ज्ञांशी सल्लामसलत आणि उपचार आवश्यक आहेत. यापैकी बऱ्याच समस्यांवर प्रभावी उपचार केले जाऊ शकतात.

* वेळीच निदान होणे महत्त्वाचे

डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहाराच्या विशिष्ट बाबींमध्ये सुधारणा होणे महत्त्वाचे आहे. नियमित आरोग्य तपासणी, गरोदरपणात शक्य तितक्या लवकर रुग्णालयात नोंदणी केल्यास योग्य लोह आणि फोलेट पूरक मूल्यमापनास मदत होते. गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजन पर्यायांबद्दल महिलांना प्रशिक्षण देणे. अशक्तपणा, फिकट गुलाबी त्वचा, श्वास लागणे आदी त्रास होत असेल तर ही रक्तक्षयाची सामान्य लक्षणे आहेत. नियमित सोनोग्राफी आणि कर्करोग तपासणी विविध परिस्थितींचे निदान आणि उपचारांमध्ये मदत करू शकते

- डॉ. शैलेजा सोलंकी, आहारतज्ज्ञ

* ही आहेत प्रमुख कारणे

मासिक पाळीच्या वेळी सर्व स्त्रिया ठराविक प्रमाणात रक्त गमावतात. काही स्त्रियांना याचा जास्त त्रास होतो. हार्मोनल असंतुलन, गर्भाशयाच्या फायब्रोइड्स, जननेंद्रियाचे विविध कर्करोग, अल्सर इत्यादी जबाबदार असू शकतात. चांगला आहार न घेणे हेदेखील यामागचे एक प्रमुख कारण आहे. रक्तक्षयाचा त्रास त्या स्त्रियांना अधिक असतो ज्या आहाराकडे पुरेसे लक्ष देत नाही. बऱ्याच स्त्रिया त्यांच्या आहाराकडे पुरेसे लक्ष देत नाहीत ज्यात लोहाची कमतरता असते. जास्त प्रमाणात गर्भधारणा, जास्तवेळ स्तनपान, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

Web Title: The incidence of anemia among young women is increasing in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.