कोरोनादरम्यान फुप्फुसाला बाधा होण्याचे प्रमाण झाले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:06 AM2021-07-21T04:06:45+5:302021-07-21T04:06:45+5:30
मुंबई : कोरोनानंतर अन्य व्याधींच्या त्रासाने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यात कोरोनामुक्तीनंतर फुप्फुसाला झालेला संसर्ग हा दीर्घ ...
मुंबई : कोरोनानंतर अन्य व्याधींच्या त्रासाने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यात कोरोनामुक्तीनंतर फुप्फुसाला झालेला संसर्ग हा दीर्घ काळासाठी त्रास देत असल्याने रुग्णांना त्याकरिता उपचार घ्यावे लागत असत, मात्र आता हे प्रमाण कमी झाल्याचे दिलासादायक वृत्त समोर आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, आता कोरोनामुक्त झाल्यानंतर अवघ्या ३ ते ६ महिन्यांत फुप्फुसाला झालेला संसर्ग बरा होत असल्याचे दिसून आले आहे.
कोकिलाबेन रुग्णालयाचे फुप्फुसाच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. सुमीत सिंघानिया यांनी सांगितले, मागील काही काळापासून कोरोनानंतरही रुग्णांच्या फुप्फुसाचे कार्य व्यवस्थित होत असल्याचे दिसून आले आहे.
कोरोनानंतर संसर्गाचा फुप्फुसावर होणारा परिणाम हा वैद्यकीय प्रबंध लंग इंडिया जर्नलमध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे. या शोध निबंधात कोरोनानंतर फुप्फुसाचा गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांच्या प्रकरणांचे निरीक्षण मांडले आहे. कोरोना रुग्णांसाठी हा मोठा दिलासा आहे. या शोध निबंधात ३०० रुग्णांचा सहभाग असून यातील ४२ रुग्णांना गंभीर आजार होता. या रुग्णांना उपचार प्रक्रियेत रेमडेसिविर आणि स्टेरॉईड देण्यात आले आहे.
डॉ. सिंघानिया यांनी सांगितले, या रुग्णांच्या प्रकृतीचा अभ्यास केला असता तीन महिन्यांच्या काळानंतर फुप्फुसाचे आरोग्य बरे होत असल्याचे दिसून आले. कोरोनानंतरही रुग्णांना सरसकट अँटी फायब्रोटिक औषधांची गरज नसल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले. यापूर्वी, कोरोनामुक्तीनंतर काही रुग्णांना दीर्घकाळासाठी फुप्फुसांचे आजार दिसून येत होते, तर काही रुग्णांना आय़ुष्यभर फुप्फुसाच्या संसर्गावर मात करण्यासाठी उपचार प्रक्रियेत राहण्याची गरज भासू लागली होती. परंतु, आता ही स्थिती हळूहळू बदलत आहे. परिणामी, फुप्फुसांची होणारी हानी कमी झाल्याने रुग्णांचे शारीरिक आरोग्य सुदृढ राहत आहे.