Join us

राज्यात पुराच्या ठिकाणी पावसाळी साथ आजारांचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात पूरस्थिती उद्‌भवलेल्या परिसरात पावसाळी साथ आजारांचा धोका असल्याने आरोग्य विभागाने तातडीने वैद्यकीय सेवासुविधा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात पूरस्थिती उद्‌भवलेल्या परिसरात पावसाळी साथ आजारांचा धोका असल्याने आरोग्य विभागाने तातडीने वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध केल्या. यात राज्यभरात २७० तापाचे रुग्ण आणि १२१ अतिसाराचे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. यावेळी एकूणच या भागात पावसाळी आजारांचे प्रमाण कमी असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली; परंतु कोविड संसर्ग व अन्य आजारांच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात येत असल्याचेही सांगितले.

राज्यभरात पूर आलेल्या परिसरात वैद्यकीय तपासणी व मदतीसाठी आरोग्य विभागाने ५१५ चमू पाठविले आहेत. या पूरस्थितीत सुमारे ७ लाख ७२ हजार नागरिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.

पुराचा विळखा पडलेल्या गावांत साथीच्या रोगांचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे कीटकनाशक आणि जंतुनाशक फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जात आहेत. औषधांसाठी तातडीचा निधी या जिल्ह्यांना दिला आहे. या ठिकाणी लसीकरणाच्या कामावर जास्त भर द्यावा लागणार आहे. हे सर्व जिल्हे कोरोनाग्रस्त आहेत. राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा या जिल्ह्यांचा रेट जास्त आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजना सुरू ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आरोग्य चमूंना त्याप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास कोरोना चाचण्या करण्यात येतील, असेही डॉ. आवटे यांनी नमूद केले आहे.