मुंबईत म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:08 AM2021-09-24T04:08:03+5:302021-09-24T04:08:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार माजवणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. शहर उपनगरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार माजवणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. शहर उपनगरात म्युकरमायकोसिसचे ६९ रुग्ण उपचाराधीन आहेत. या रुग्णांवर मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचार सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. आतापर्यंत ६९३ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाण अधिक होते. याशिवाय, मुंबईबाहेरील रुग्णही शहरात उपचारांसाठी दाखल होण्याचे प्रमाण वाढले होते. परंतु, यात घट होत असून दैनंदिन निदानाचे प्रमाण २ ते ३ रुग्णांवर आले आहे. मुंबईत १३ जुलैला म्युकरचे ६२० रुग्ण होते. तर, १०४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत रुग्णांचा आकडा ९१८ वर पोहोचला असून, १७८ रुग्णांचा मृत्यू झाला. केवळ दीड महिन्यात २९८ रुग्णांची भर पडली होती, ७४ रुग्णांचा मृत्यू झाला. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा आलेख घसरला आहे. केईएम रुग्णालयात आतापर्यंत १३० म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले, परंतु आता २० सक्रिय रुग्ण असून, या आठवड्यात केवळ दोन रुग्णांचे निदान झाले आहे.