सात विभागात रुग्णवाढीचा दर अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 01:32 AM2021-03-04T01:32:08+5:302021-03-04T01:32:19+5:30
जानेवारी महिन्यात दररोज बाधित रुग्णांचा आकडा तीनशेपर्यंत खाली आला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून लोकलमधून सर्वसामान्य लोकांनाही प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबईतील रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.२९ पर्यंत वाढला आहे, तर वांद्रे प., चेंबूर, मुलुंड, अंधेरी प., सायन, गोवंडी, घाटकोपर या विभागात त्याहून अधिक रुग्णवाढ दिसून येत आहे. दररोज या विभागांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजना सुरू आहेत.
जानेवारी महिन्यात दररोज बाधित रुग्णांचा आकडा तीनशेपर्यंत खाली आला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून लोकलमधून सर्वसामान्य लोकांनाही प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यांनी बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दररोज एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दरही वाढला आहे.
ही वाढ सुरुवातीला चेंबूर आणि मुलुंडमध्ये अधिक दिसून येत होती. त्यामुळे महापालिकेने कडक उपाययोजना आखून काही निर्बंध आणले.
या विभागात सर्वाधिक वाढ विभाग... दैनंदिन रुग्णवाढ
एच पश्चिम, वांद्रे प ०.४३
एम पश्चिम, चेंबूर ०.४२
टी, मुलुंड ०.४०
के पश्चिम, अंधेरी प. ०.३८
एफ उत्तर, सायन, माटुंगा ०.३४
एम पूर्व..गोवंडी, मानखुर्द ०.३३
एन, घाटकोपर ०.३१
इमारतींमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक
nगेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव चाळी व झोपडपट्टीत नव्हे तर इमारतींमध्ये अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार गेल्या आठवड्याभरात इमारतींमधील तब्बल एक हजार मजले प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यामुळे सील मजल्यांची संख्या २०१६वर पोहोचली आहे, तर १४५ इमारती पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.
nजानेवारी महिन्यात बाधित रुग्णांची संख्या तीनशेपर्यंत खाली आली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊन दररोज एक हजार रुग्ण सापडत होते. त्यामुळे पाचहून अधिक बाधित रुग्ण आढळले तर संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय घेतला, तर दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास मजला, इमारतीचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहे.
nत्यामुळे प्रतिबंधित मजल्यांची संख्या पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून जनजागृती, तपासणी आणि चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. दररोज सरासरी १८ हजार चाचण्या करण्यात येत आहेत. चाळी-झोपडपट्ट्यांमध्ये केवळ ११ बाधित क्षेत्र आहेत.
विनामास्क फिरणाऱ्या लोकांना दंड
१ मार्च रोजी पालिकेने १४ हजार
९८३ जणांवर कारवाई करीत २९ लाख ९६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला, तर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७९८८ जणांकडून १५ लाख ९७ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ४९५ जणांवर कारवाई करून ९९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. एकाच दिवशी २३ हजार ४६६ जणांवर कारवाई करीत ४६ लाख ९३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सरकारी व खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती आणि लग्न समारंभ, व्यायामशाळा, हॉटेल, पब या ठिकाणी ५० लोकांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर फौजदारी कारवाईदेखील सुरू करण्यात आली आहे. कोरोना संक्रमण कमी करण्याचा प्रशासनाचा हेतू आहे. नागरिकांनी त्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.