मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील कामा लेन येथील त्रिभुवन मिठाईवालाच्या मागे रामनिवास या खासगी सोसायटीच्या आवारात विहीर आहे. या विहिरीच्या अर्ध्या भागावर आरसीसी करून ती झाकली होती. त्या आरसीसी केलेल्या भागावर रहिवासी कार पार्क करीत. मात्र आरसीसीचा भाग खचून पार्क केलेली कार पाण्यात बुडाल्याची घटना १३ जून रोजी घडली होती. त्यानंतर तब्बल १२ तासानंतर या ठिकाणी चाळीस फूट खोल पडलेली ही कार बाहेर काढण्यास अखेर यश आले होतं. या विहिरीमधील लाखो लिटर पाणी उपसल्यानंतर अखेर क्रेनच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली.
सोशल मीडियावर सदर घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे कारने आत्महत्या केल्याचे मिम्स आणि जोक सोशल मीडियावर फिरत होते. मात्र या सर्व घटनेनंतर बजाज अलाएन्सने आता कार मालकाला म्हणजे डॉ. किरण दोषींना नवी कोरी कार भेट दिल्याची माहिती समोर आली आहे.
बुडालेल्या कारचे मालक असलेले मुंबईतील डॉ. किरण दोषी सांगतात की, 'कार पाण्यात बुडाल्यानंतर बजाज अलाएन्सचे कर्मचारी माझ्या घरी आले. त्यांनी माझ्याकडून काही फॉर्म भरुन घेतले. त्यानंतर त्यांनी मला कोणत्या कार डिलरकडून कार घेणार हे कळवण्यास सांगितलं. त्या कार डिलरला कंपनीच्या वतीने कार पुरवण्यात आली, असं कार मालकांनी सांगितले.
नेमकं काय घडलं होतं?
घाटकोपरच्या राम निवास बिल्डिंगसमोर नौरोजी लेन येथे किरण दोषी यांची मोटार कार चक्क स्लब तोडून खाली भूमिगत केलेल्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. गाडी विहिरीवर असलेल्या स्लॅबवर पार्क केली होती. ही गाडी १३ जून रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास गाडी स्लॅब खचल्याने ४० फुट खोल विहिरीमधे पडली.या घटनेत कुणी जखमी वगैरे झालं नाही. ही गाडी ज्यांची होती त्यांनीच गाडी बुडतानाचा हा व्हिडीओ बनविला होता. हा व्हिडीओ समाजमाध्यमावर तुफान व्हायरल झाला. ट्विटरवर घाटकोपर हे नाव देखील या व्हिडीओमुळं ट्रेंडिंगला आलं होतं. माहितीनुसार घाटकोपरमध्ये या विभागात अशा प्रकारे अनेक विहिरी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ही विहीर देखील खूप वर्ष जुनी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
बीएमसीचं स्पष्टीकरण-
या घटनेचा व्हिडीओ आल्यानंतर काही यूजर्सनी मुंबई महापालिकेला याबाबत विचारणा केली होती. यावर BMC नं ट्विट करत सांगितलं की, घाटकोपरमधील कारच्या या घटनेशी महानगरपालिकेचा दुरान्वयानेही संबंध नाही. ही खासगी सोसायटी परिसरातील घटना आहे, असं बीएमसीकडून सांगण्यात आलं होतं.