मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानासमोर अनुचित घटना घडू शकते, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पत्र घटनेच्या चार दिवस आधीच सहपोलीस आयुक्तांना (कायदा व सुव्यवस्था) देण्यात आले होते, अशी बाब आता समोर आली आहे. या पत्राची एक प्रत मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासही देण्यात आली होती.
पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक करण्याची घटना ८ एप्रिल रोजी दुपारी घडली होती. मात्र, विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त निशीथ मिश्रा यांनी अशी घटना घडू शकते, ही पूर्वकल्पना ४ एप्रिल रोजीच सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना दिली होती. अशी पूर्वकल्पना देऊनही पवार यांच्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ का केली नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ज्या नांगरे-पाटील यांना हे पत्र देण्यात आले होते, त्यांनाच आता या घटनेची चौकशी करण्यास गृह विभागाने सांगितले आहे.
हे शूरपणाचे लक्षण नाहीसिल्व्हर ओक हल्ल्याबाबत ४ एप्रिलला गुप्तचर विभागाने पत्र लिहून कळवले होते, तरीसुद्धा दुर्लक्ष झाले. जास्तीचा बंदोबस्त ठेवायला हवा होता तेवढा ठेवला गेला नाही, असे स्पष्ट करतानाच आरोप करणे सोपे असते आणि मग स्वतःवर आरोप झाले की सामोरे जायचे नाही हे शूरपणाचे लक्षण नाही, असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी किरीट सोमय्या यांना लगावला.सिल्व्हर ओकसह अन्य बंगल्यांबाबतही इशाराकेवळ सिल्व्हर ओकच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बंगला तसेच वर्षा हे शासकीय निवासस्थान, आझाद मैदान, मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान व वांद्रे येथील खासगी निवासस्थान या ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलन करू शकतात आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे निशीथ मिश्र यांनी पत्रात म्हटले होते.पत्रात आणखी काय म्हटले होते? - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतची सुनावणी ५ एप्रिल रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. आझाद मैदानावर १५०० ते १६०० आंदोलक जमलेले आहेत. आंदोलकांची संख्या वाढत आहे. विलीनीकरणाचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध लागण्याची जाणीव एसटी कर्मचाऱ्यांना झालेली आहे. - एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालय, सिल्व्हर ओक, मातोश्री बंगला या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.- एसटी कर्मचारी खासगी वाहनाने किंवा रेल्वेने येण्याची शक्यता आहे. खासगी वाहनाने मुलुंड चेक नाका, वाशी चेक नाका व दहिसर चेक नाका येथून हे कर्मचारी प्रवेश करणार असून, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी विनंती आहे.- आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे व खबरदारीची उपाययोजना म्हणून योग्य तो बंदोबस्त लावणे उचित ठरेल.