Join us

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत महानुभाव तीर्थस्थानांचा समावेश करा; निवेदनातून मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: July 03, 2024 6:45 PM

'महानुभाव स्थान महात्म्य'चे हरिहर पांडे यांनी वेधले शासनाचे लक्ष

मनोहर कुंभेजकर, मुंबई: यंदाच्या पावसाळी अधिवेशनात 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' राबविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या योजने'च्या आराखड्यात महानुभाव तीर्थक्षेत्रांचाही समावेश असावा, याकडे 'महानुभाव स्थान महात्म्य अभियाना'चे समन्वयक हरिहर पांडे यांनी शासनाचे लक्ष्य वेधले आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय तसेच 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी हरिहर पांडे यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तीर्थस्थानांच्या यादीसह निवेदन दिले.

महानुभाव पंथ प्रवर्तक परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात सत्य, अहिंसा, समता, मानवता ही मूल्ये समाजाला दिली. मराठीला ‘लीळाचरित्र’ हा आद्यग्रंथ दिला. ८०० वर्षांपूर्वी श्रीचक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने महाराष्ट्रात २४५ गावांमध्ये १६५० तीर्थस्थाने निर्माण झालीत. तसेच भगवान श्रीकृष्ण महाराज, श्रीदत्तात्रेय प्रभू, श्रीचक्रपाणी महाराज, श्रीगोंविंद प्रभू महाराज या परमेश्वर अवतारांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली तीर्थस्थाने राज्यातील ३ टक्के, देशातील दीड कोटी आणि जगभरातील कोट्यावधी महानुभावियांचे मोक्षप्राप्तीचे साधन आहे. राज्यात १६ जिल्ह्यांमध्ये असलेल्या महानुभाव तीर्थक्षेत्रांचा 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'त समावेश करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

तीर्थक्षेत्रांच्या यादीत महानुभावांची काशी रिद्धपूर (अमरावती), डोमेग्राम-कमालपूर (अहमदनगर) पैठण, कानडगाव (औरंगाबाद), फलटण (सातारा), माहूर (नांदेड), पांचाळेश्वर (बीड), खनेपुरी, रामसगांव (जालना), मनसर (नागपूर), कनाशी (जळगाव), सुकेणे (नाशिक) आदी २४५ तीर्थस्थानांसह बुलढाणाजवळील जाळीचादेव, यवतमाळ जिल्ह्यातील अंबाळी खांडीचाही  यादीत समावेश आहे. दि,२९ जून २०२४ रोजी घोषीत झालेल्या 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'च्या आराखड्यात यादीतील तीर्थस्थानांच्या समावेशासाठी संबधित विभागाला लेखी सूचना देऊ, असे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पांडे यांना सांगितले.

टॅग्स :मुख्यमंत्रीमुंबई