महादेव, मल्हार आणि टोकरे कोळी यांचा अनुसूचित जमातींत समावेश?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 06:26 AM2023-10-21T06:26:33+5:302023-10-21T06:26:46+5:30
समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महादेव, मल्हार आणि टोकरे कोळी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बाज कोळी समाजाच्या विविध मागण्या तसेच जातीचे दाखले, वैधता प्रमाणपत्र विषयावर सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत शिंदेंनी कोळी समाजासाठी महर्षी वाल्मीकी महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही दिली. तसेच महादेव, मल्हार आणि टोकरे कोळी समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.
बैठकीतील निर्णय
n कोळी समाजाच्या जातीचे दाखले आणि वैधता विषयक न्यायालयातील विविध निकालांचा विधी आणि न्याय विभागाकडून मत मागविण्यात यावे.
n आदिवासी विभागाच्या कार्यालयातील अधिकारी जळगाव येथेही उपस्थित राहून कामकाज पाहतील.
n या समाजाच्या प्रलंबित १२ हजार दाखल्यांचा फेरविचार करावा.
या नेत्यांची होती बैठकीला उपस्थिती
या बैठकीला आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार रमेशदादा पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चिमणराव पाटील, महसूल आणि वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड , माजी आमदार शिरीष चौधरी, तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.