९ वर्षांत ४० लाखांचे उत्पन्न, संपत्ती २ कोटींची! विमा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे सापडले घबाड; सीबीआयची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 09:34 AM2024-01-20T09:34:44+5:302024-01-20T09:34:58+5:30
सीबीआयकडून प्राप्त माहितीनुसार, बोभाटे हा कंपनीच्या मुंबई विभागात १ एप्रिल २०१४ ते ११ जुलै २०२३ पर्यंत कार्यरत होता.
मुंबई : द न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीत वरिष्ठ सहायकपदावर काम करणाऱ्या दिनेश बोभाटे याच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळल्याप्रकरणी सीबीआने गुन्हा नोंदवला आहे. त्याच्यासोबत त्याच्या पत्नीविरोधातही हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सीबीआयकडून प्राप्त माहितीनुसार, बोभाटे हा कंपनीच्या मुंबई विभागात १ एप्रिल २०१४ ते ११ जुलै २०२३ पर्यंत कार्यरत होता. त्या काळामध्ये त्याला वेतनाच्या माध्यमातून ४० लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले. मात्र, या कालावधीमध्ये त्याने गोळा केलेली संपत्ती ही २ कोटी ५८ लाख ६९ हजार ५७८ रुपये इतकी असल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून गोळा केलेली संपत्ती त्याने स्वतःच्या व पत्नीच्या नावे ठेवली होती.
जनतेच्या कामाशी थेट संपर्क असल्यामुळे त्याने आपल्या पदाचा गैरवापर करत ही माया गोळा केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याच्या व त्याच्या पत्नीच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.