राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांना आयकर विभागाने कारवाई करून दणका दिला आहे. नरीमन पॉईंट परिसरातील त्यांच्या घरावर आयकर विभागाने बेनामी ट्रान्सक्शन ऍक्ट १९८८ अन्वये टाच आणली आहे. अजोय मेहता हे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंचे प्रधान सल्लागार आहेत. त्यांना धनत्रयोदशीच्या दिवशीच हा जोरदार दणका बसला आहे.
अजोय मेहता यांनी हा फ्लॅट ५.३३ कोटींना एका शेल कंपनीकडून विकत घेतला. वास्तविक या फ्लॅटचे बाजारमूल्य १०.६२ कोटी रूपये आहे. अनामित्रा प्रॉपर्टीज प्रा. लि. या शेल कंपनीकडून हा फ्लॅट त्यांनी विकत घेतला आहे. मंत्रालयाजवळील जनरल जग्गनाथ भोसले मार्ग येथील समता कोऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये ५ व्या मजल्यावर मेहता यांनी फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटचे चटई क्षेत्र (कार्पेट एरिआ) तब्बल १,०७६ स्वेअर फूट इतके आहे. फ्लॅटसोबतच या इमारतीमध्ये मेहता यांना दोन कार पार्किंग स्पॉट मिळाले आहेत.
अजोय मेहता यांनी मूळ बाजार मूल्यापेक्षा कमी किंमतीत हे घर विकत घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे घर जप्त करण्यात आलं आहे. ज्या शेल कंपनीकडून अजोय मेहतांनी हा फ्लॅट विकत घेतला आहे. ती कंपनी अविनाश भोसले यांची आहे, असाही आरोप आयकर विभागाने केला आहे. अजोय मेहता यांनी खरेदी केलेलं हे घर म्हणजे अविनाश भोसले यांची बेनामी संपत्ती आहे, असाही संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे.
कोण आहेत अजोय मेहता?
अजोय मेहता हे १९८४ च्या बॅचचे आयपीएल अधिकारी असून मे २०१९ मध्ये त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली होती. याआधी त्यांनी चार वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळली होती. सप्टेंबर २०१९ साली ते निवृत्त होणार होते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना ६ महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली होती. त्यानंतर कोविड काळामुळे त्यांना पुन्हा एकदा ३ महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. ते ३० जून रोजी निवृत्त झाले. आता ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून काम पाहात होते.