मुंबई : प्राप्तिकर विभागाने आयटी सेझ विकासक, आयटी सेझचे माजी संचालक आणि चेन्नईतील स्टेनलेस-स्टीलचे प्रमुख यांच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी मुंबईसह, चेन्नई, हैदराबाद आणि कुडलोर येथील १६ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. आतापर्यंतच्या धाड सत्रात ४५० कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न सापडले असून, अधिक तपास सुरु आहे.
आयटी सेझ माजी संचालक आणि त्याच्या कुटुंबीयांनी गेल्या ३ वर्षात सुमारे १०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे प्राप्तिकर विभागाच्या तपासात उघड झाले आहे. अशातच त्यांनी १६० कोटी रूपयांचा प्रकल्प सुरु असल्याचे खोटे पुरावेही सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कंपनीने सल्लागारांचे बनावट शुल्क म्हणून सुमारे ३० कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचा आणि २० कोटी रुपयांच्या अस्वीकारार्ह व्याज शुल्काचाही दावा केला होता. या धाडसत्रात, आयटी सेझ विकासकाशी संबंधित काही समभाग खरेदी व्यवहार उघडकीस आला आहे. या संस्थेच्या समभागांची विक्री त्याच्या पूर्वीचे भागधारक, रहिवासी आणि अनिवासी संस्था यांनी केली होती, ज्यांनी २०१७-१८ आर्थिक वर्षात मॉरीशस इथल्या मध्यस्थाद्वारे २ हजार ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र या विक्री व्यवहारातून झालेला भांडवली नफा प्राप्तिकर विभागाकडे जाहीर करण्यात आलेला नसल्याचेही समोर आले.
यातील भांडवली नफ्याबाबत अधिक चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे पुरवठादार गट हिशेबी, बेहिशेबी आणि अंशतः हिशेबी असे विक्रीचे तीन व्यवहार करत आहे. बेहिशेबी आणि अंशतः हिशेबी विक्रीचे प्रमाण दरवर्षी एकूण विक्रीच्या २५% पेक्षा जास्त होते. तसेच त्यांनी विविध ग्राहकांना सेल्स अकोमोडेशन बिले दिली आहेत. आणि या व्यवहारांवर १०% पेक्षा जास्त कमिशन घेतले. यात १०० कोटीचे बेहिशेबी उत्पन्न समोर येत आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.