लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांच्या मुंबई आणि लखनौ येथील सहा कार्यालयांची आयकर विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून विविध सामाजिक कार्यासाठी केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचे स्रोत जाणून घेण्यासाठी संबंधित कागदपत्रांची छाननी केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बुधवारच्या या कारवाईमुळे बॉलिवूड वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सोनू सूद यांची नुकतीच दिल्ली सरकारने शाळकरी विद्यार्थ्यांसाठीच्या अभियानासाठी ब्रँड ॲम्बॅसडर म्हणून निवड केली आहे. 'आप'च्या माध्यमातून त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयकर विभागाच्या बुधवारच्या तपासणी मोहिमेमागे राजकीय कारवाईचा रंग असल्याची चर्चा रंगली आहे.
४८ वर्षीय सोनू सूद यांनी लॉकडाऊनमध्ये केलेल्या मदतीमुळे ते चर्चेत आले. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेक परप्रांतीयांना सोनू सूद यांनी त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम केले. इतकेच नाही तर अनेकांच्या जेवणासोबत राहण्याची, रोजगाराचीही त्यांनी व्यवस्था केली. लॉकडाऊन काळात केलेल्या समाजकार्यामुळे सोनू सूद यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे त्याला राजकीय रंगही दिला जात होता. यामुळे त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, सोनू सूद यांनी नेहमीच या अफवा असल्याचे सांगत त्याचा इन्कार केला आहे.