Join us

प्राप्तिकर विभागाचे ओबेरॉय रियल्टी, इन्फ्रा प्रोजेक्ट्सवर छापे; गृहप्रकल्पाच्या विक्रीत गैरव्यवहाराचे संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 1:56 AM

या कंपनीने काही दिवसांपूर्वी ४०० कोटींच्या मोठ्या प्रकल्पांची नोंदणी केली असून त्या व्यवहारांतही अनियमितता असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबई : रियल इस्टेट क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या ओबेरॉय रियल्टी आणि त्याचे विक्रेते कॅपेसाईट इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे मारून महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त केले आहेत. गृह प्रकल्पाच्या विक्रीसाठीच्या ‘ब्राऊशर’वरील किमती आणि प्रत्यक्षात नोंदणीकृत किमतीमध्ये प्रचंड तफावत आढळून आली आहे. त्याचबरोबर अन्य बेनामी व्यवहार केले असल्याचा संशय असल्याचे आयकर विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

गेल्या दोन महिन्यांपासून रियल इस्टेटमधील कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. देशभरातील विविध कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. मात्र मंगळवारी ओबेरॉय रियल्टी व कॅपेसाईट प्रोजेक्ट्सवर टाकलेल्या छाप्यामुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.आयकर विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरापासून ओबेरॉय रियल्टी आणि कॅपेसाइटच्या व्यवहाराबाबत माहिती मिळविण्यात येत होती. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर विभागाच्या पथकांनी स्वतंत्रपणे मंगळवारी सकाळपासून कार्यालयावर छापे मारले.

कंपनीकडून बनविलेल्या व विक्री करण्यात आलेल्या फ्लॅट, गाळ्याच्या खरेदीच्या तपशिलासंबंधी कागदपत्रे, नोंदणी दस्तऐवज व बॅँकांचे व्यवहार तपासण्यात आले. या कंपनीने काही दिवसांपूर्वी ४०० कोटींच्या मोठ्या प्रकल्पांची नोंदणी केली असून त्या व्यवहारांतही अनियमितता असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :मुंबईमुख्य आयकर आयुक्त कार्यालय