शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 06:24 AM2022-02-26T06:24:46+5:302022-02-26T06:25:13+5:30
निकटवर्तीयांसह मुंबईत २५ ठिकाणी सर्च ऑपरेशन
मुंबई : कर चुकवेगिरीप्रकरणी शिवसेना नेते तसेच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ताडवाडी येथील घरात शुक्रवारी सकाळपासून प्राप्तिकर विभागाकडून झाडाझडती सुरू असून, चौकशी करण्यात येत आहे. जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांवर मुंबईत २५ ठिकाणी आयकर विभागाचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. यादरम्यान महत्त्वपूर्ण दस्तऐवज प्राप्तिकर विभागाने ताब्यात घेतला आहे.
यशवंत जाधव हे ४ वर्षांपासून मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. शुक्रवारी सकाळी ७ वाजता आयकर विभागाचे पथक जाधव यांच्या ताडवाडी येथील बिलखादी चेंबर्स येथील निवासस्थानी धडकले. यावेळी सीआयएसएफच्या जवानांबरोबर मुंबई पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कारवाईबाबत समजताच, घराजवळील दुकानेही बंद करण्यात आली होती.
जाधव दाम्पत्याने कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचे प्राप्तिकर विभागाच्या चौकशीतून समोर आले होते. यामिनी यांनी प्रधान डिलर्स नावाच्या कंपनीकडून १ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. मात्र, ही शेल कंपनी असून, पुढे यातूनच १५ कोटींचे मनी लॉन्ड्रिंग केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला आहे. यामध्ये करचुकवेगिरी करण्यात आली आहे का? याबाबत प्राप्तिकर विभाग अधिक तपास करत आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाधव यांच्यावर कोविड सेंटर उभारणीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. ‘यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपये रोख स्वरुपात मनी लॉण्ड्रिंग करणाऱ्या उदय शंकर महावारला दिले आहेत. हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले. या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला. हे सर्व बोगस होते. त्यानंतर हे पंधरा कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे पाठवले. त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत आहे,’ असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याच आरोपांवरून ही चौकशी सुरु असल्याचे समजते आहे. मात्र, याबाबत प्राप्तिकर विभागाकडून कुठल्याही स्वरुपाची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
शिवसेना विभाग संघटक विजय लिपारे यांच्या घरावरही प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. विजय लिपारे हे यशवंत जाधव यांचे निकटवर्तीय आहेत. यापूर्वी ते मनसेचे भायखळा विभागाध्यक्ष होते. त्यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. मागील विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी लिपारेंना मातोश्रीवर नेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधले होते. तेव्हापासून विजय लिपारे हे यशवंत जाधव यांच्या सोबत सातत्याने दिसत आहेत. त्यांच्या घरातूनही महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.
आयटीचे पथक मुक्कामी
मुंबईत शुक्रवारी आयटीकडून २५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. यात प्रामुख्याने जाधव यांची दोन घरे, कार्यालय, जाधव यांचे काळाचौकीतील जवळची व्यक्ती, म्हाडा काॅलनी परिसरात राहणारे सीए तसेच इतर महत्वाचे पालिकेतील बडे कंत्राटदार याचा समावेश आहे. आयकर विभागाचे पथक शुक्रवारी रात्री जाधव यांच्या घरी मुक्कामी थांबणार असल्याचे समजते.
...त्या कंत्राटदारावर कारवाई सुरु
मुंबईचे माजी पोलीस आयूक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचा आरोप करणाऱ्या मालाडच्या कंत्राटदारावरही आयटीची कारवाई सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.