मुंबई – शिवसेनेचे महापालिकेतील नेते यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय आयकर विभागाने धाड टाकली आहे. मागील ५ वर्षापासून यशवंत जाधव हे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्यानंतर शिवसेनेच्या नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केल्यानं शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.
भाजपाचा आरोप
यशवंत जाधव यांनी प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावे १५ कोटींची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आयटीच्या तपासणी अहवालात समोर आल्याचा आरोप आहे. भाजपा नेते आमदार अमित साटम यांनी हा आरोप केला होता. स्थायी समितीचे अध्यक्ष असल्यापासून टेंडरच्या माध्यमातून हा पैसा फिरवण्यात आला. मागील २५ वर्षापासून स्थायी समितीत वसुली झालीय. २०१५ मध्ये ६ हजारांना महापालिका टॅब विकत घ्यायची त्याची किंमत २०२२ मध्ये २० हजार रुपये दाखवण्यात आली. महापालिकेत दरवर्षी किमान ६ हजार कोटींचे टेंडर पास होतात. २५ वर्षाचा हिशोब लावला तर किमान दीड लाख कोटींचा भ्रष्टाचार स्थायी समितीच्या माध्यमातून शिवसेनेने केला आहे असा आरोप भाजपाने केला होता.
आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी
आयकर विभागानं म्हटलं होतं की, २०१९ मध्ये निवडणुकीत यामिनी जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती संबंधित चुकीची माहिती जोडली होती. त्यासाठी यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या प्रकरणी आयकर विभागाने यामिनी जाधव यांच्या प्रतिज्ञापत्राची चौकशी केली असता ही बाब समोर आली. तपासात कोलकाता येथील शेल कंपन्याद्वारे काही आर्थिक व्यवहार झाल्याचं उघडकीस आलं. ज्यात यामिनी जाधव, त्यांचे पती आणि कुटुंबाने पैसे कमवले होते.
काय आहे प्रकरण?
२०११-१२ मध्ये उदय महावर नावाच्या व्यक्तीनं प्रधान डिलर्स नावाची कंपनी बनवली होती. त्यात पैसे जमवले त्यानंतर ही कंपनी जाधव कुटुंबाला विकली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात जवळपास ७.५ कोटी संपत्ती असल्याची माहिती देण्यात आली होती. ज्यात २.७४ कोटींची स्थावर मालमत्ता होती. तर आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांच्याकडे ४.५९ कोटी संपत्ती असल्याचं समोर आलं होतं. ज्यात १.७२ कोटींची स्थावर मालमत्ता होती. यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आहेत.