झी समूहाच्या कार्यालयांवर आयकरचे छापे; मुंबई, दिल्लीतील १५ ठिकाणी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 07:33 AM2021-01-05T07:33:27+5:302021-01-05T07:33:58+5:30
Income Tax Raid On Zee काही त्रुटींबाबत आयकर विभागाने कार्यालयांना भेट दिली असून, त्यांना सहकार्य करण्यात येत आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटीत विविध आर्थिक व्यवहारांची माहिती घेतली. हा नेहमीच्या कामाचा भाग आहे, असा दावा झी समूहाच्या प्रवक्त्याने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील सर्वात मोठ्या माध्यमसमूहापैकी एक असलेल्या झी एन्टरटेन्मेन्ट समूहावर आयकर विभागाने सोमवारी छापे टाकले. लाखो रुपयांचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी मुंबई व दिल्लीतील त्यांच्या १५ कार्यालयांवर छापे टाकून तेथील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, काही त्रुटींबाबत आयकर विभागाने कार्यालयांना भेट दिली असून, त्यांना सहकार्य करण्यात येत आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटीत विविध आर्थिक व्यवहारांची माहिती घेतली. हा नेहमीच्या कामाचा भाग आहे, असा दावा झी समूहाच्या प्रवक्त्याने केला आहे.
झी समूहाच्या लोअर परळ येथील मुख्य कार्यालयासह १५ ठिकाणी सकाळी अकराच्या सुमारास अधिकाऱ्यांची स्वतंत्र पथके गेली. प्रत्येक पथकामध्ये सहाजणांचा समावेश होता. सर्व कर्मचाऱ्यांना एका खोलीत थांबण्यास सांगून तपासणी करण्यात आली.
जीएसटी बुडविला?
n जीएसटी विभागाच्या महासंचालकाकडून आयकर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार हे छापे टाकण्यात आल्याचे समजते.
n या समूहाकडून जीएसटी व आयकर मोठ्या प्रमाणात बुडविण्यात आला आहे, त्यामुळे संबंधित वर्षांतील प्रत्येक विभागाचे आर्थिक व्यवहार तपासण्यात येत आहेत.
n अनेक दस्तावेज, कागदपत्रे व बँक व्यवहारासंबंधी पुस्तके जप्त केल्याचे सूत्रांनी सांगण्यात आले.