मुंबई : नेपाळमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलन करतानाच देणगी देणाऱ्यांना करामध्ये सूट देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या परगानग्या तातडीने देण्यात येणार असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जाहीर केले आहे. याकरिता प्राप्तिकर विभागाने देशपातळीवर ‘तात्काळ’ व्यवस्था सुरू केली आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्ती अथवा काही विशिष्ट प्रकारची देणगी गोळा करायची असल्यास त्यासंदर्भात प्राप्तिकर खात्याची परवानगी अनिवार्य असते. याचसोबतच, ज्या लोकांना याकरिता देणगी द्यायची असते, त्यांना जेवढी रक्कम देणगीच्या रुपात दिली जाते, त्यात प्राप्तिकरात १०० टक्के वजावट मिळते. मात्र, याकरिता ज्यांना ती देणगी देण्यात येत आहे, त्यांच्याकडे कर वजावट देण्याकरिता प्राप्तिकर खात्याकडून आवश्यक ती परवानगी असणे गरजेचे असते. परंतु, ही परवानगी मिळविण्याची प्रक्रिया अधिक क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. मात्र, प्रक्रियेच्या जंजाळाचा फटका मदतीला बसू नये याकरिता एका विशेष प्राप्तिकर विभागातर्फे पथकाची स्थापना करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)