Join us

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग; पक्षप्रवेशावेळी सत्ताधाऱ्यांना दिलं 'ओपन चॅलेंज'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 4:34 PM

गद्दारी करणाऱ्यांना शिवसेना एकच धक्का अशी देते, की ते भुईसपाट होतात, असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

Shivsena Uddhav Thackeray ( Marathi News ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्री या निवासस्थानी मराठी अभिनेते किरण माने यांच्यासह मनसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांना एक आव्हानही दिलं आहे.

"एवढे खोके घेऊनही, घटनाबाह्य सरकारला उठता बसता उद्धव ठाकरे दिसतात. कारण उद्धव ठाकरे एकटा नसून माझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे. लढाई मोठी आहे, पण तुमच्यासारखे कट्टर शिवसैनिक एकवटले; तर ही लढाई सोपी आहे. सत्ताधाऱ्यांना माझं आव्हान आहे की लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लावून दाखवा," असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. गद्दारी करणाऱ्यांना शिवसेना एकच धक्का अशी देते, की ते भुईसपाट होतात, असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

"देशात सत्तांतर होणार"

लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तांतर होणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी आज केला आहे. "बीडचे ‘निर्भीड’ शिवसैनिक पक्षात प्रवेश करताहेत. आज फुटलेल्या पालवीचा उद्या बीडमध्ये महावृक्ष होणार आहे. शिवसेनेसारखं प्रेम दुसऱ्या कोणत्याच पक्षात मिळत नाही. राजकारणात विरोधी पक्षातून सत्ताधाऱ्यांकडे जाणाऱ्यांचा ओघ जास्त असतो. पण आज तुम्ही सत्ता आणण्यासाठी इथे आला आहात. भविष्यात देशात सत्तांतर होणार आणि रामराज्य येणार," असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावेळी १३ जानेवारी रोजी आपण कल्याण लोकसभेचा दौरा करणार असल्याची घोषणाही केली आहे. यावेळी शिवसेनेच्या विविध शाखांना भेटी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाकरे यांची ही घोषणा कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना दिलेलं आव्हान मानलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेतील दोन गटांतील संघर्ष आगामी काळात आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबईएकनाथ शिंदेमनसे