मुंबई - मुंबई महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी हॉस्पिटल आणि कूपर हॉस्पिटल येथील कंत्राटी कामगारांचे किमान वेतनासह इतर मूलभूत हक्क डावलले जात आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन ठेकेदारांची पाठराखण करत असल्याचा निषेध करत श्रमजीवी कामगार संघटना 16 ऑक्टोबर म्हणजे ऐन दिवाळीच्या तोंडावरच मुंबई महापालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन करणार आहे. यावेळी श्रमजीवी कामगार संघटनेचे प्रमुख माजी आमदार विवेक भाऊ पंडित स्वतः या आंदोलनात उतरून ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पितळ उघडं पाडणार आहेत. हे आंदोलन कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा श्रमजीवीच्या मुंबई जिल्हाध्यक्ष नलिनी बुजड यांनी दिला आहे.
कांदिवली येथील भारतरत्न डॉ. आंबेडकर रूग्णालय व कूपर रूग्णालयातील सफाई व अन्य कंत्राटी कामगार हे श्रमजीवी कामगार संघटनेचे सभासद आहेत. या कामगारांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी गेले सहा ते सात महिने श्रमजीवीचे पदाधिकारी आणि कामगार प्रतिनिधी सातत्याने निवेदन, आंदोलन, शिष्टमंडळ आशा विविध मार्गाने पाठपुरावा करत आहोत. मात्र या बदल्यात महापालिका प्रशासनाकडून कामगारांना अश्वासनापालिकडे काहीही मिळालेले नाही. या कामगारांना किमान वेतन व अन्य कायदेशीर लाभ अजून पर्यंत दिले गेलेले नाहीत. ठेकेदार व अधिकाऱ्र्यांकडून कामगारांच्या होणाऱ्र्या शोषणाविरोधात गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ महापालिका आयुक्तांकडेही तक्रारी करून,चर्चा करून झाली आहे मात्र त्यांनीही याबाबत अजूनही गंभीर दखल घेतली नाही.
येथे एनजीओ या नावाने स्वयंसेवक कामगार असा अजब फॉर्म्युला वापरून महापालिकेचे काही अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने मोठा घोटाळा करत कामगारांचे शोषण करत आहेत. रोज प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांची हॉस्पिटल प्रशासन, महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकरवी होत असलेली पिळवणूक आणि शोषण अत्यंत निषेधार्ह आहे असे परखड मत श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांनी व्यक्त केले असून प्रशासनाने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या शोषणाविरोधात आम्ही श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने सोमवार १६ ऑक्टोबर पासून सकाळी 10 वाजल्यापासून मुंबई महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर कामगार आणि कार्यकर्ते बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.