मुंबई : अशासकीय आयटीआयला इतर राज्यांच्या धर्तीवर अनुदान देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता खात्याविरोधात राज्यातील खासगी आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेने ११ जानेवारीपासून बेमुदत बंदचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाला राज्य शिक्षण संस्था महामंडळानेही सक्रीय पाठिंबा दिल्याचे, महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेने सांगितले.संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी सांगितले की, ‘केंद्र सरकारच्या धोरणानुसार सर्व प्रकारचे तांत्रिक शिक्षण हे कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अखत्यारित आले आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या कोर्सेससाठीही शासनाकडून प्रशिक्षणार्थींना व्यावसायिक शुल्क परत मिळणार आहे. मात्र, दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रशिक्षित करणाऱ्या खाजगी आयटीआयला प्रशासनाने कौशल्य विकास अंतर्गत आणूनही अनुदानापासून मात्र दूर ठेवले आहे. शासनाने खासगी आयटीआयमधील ८० टक्के प्रवेश आॅनलाइन पद्धतीने भरण्यास सुरुवात केली असून, त्या बदल्यात संस्थांना एक पैसाही मिळत नाही. याउलट शासकीय आयटीआयवर प्रति विद्यार्थी ७० हजार रुपये खर्च केले जातात. त्यामुळे समान कामासाठी समान दाम देण्याची संघटनेची मागणी आहे. ८ दिवसांत मागणी पूर्ण झाली नाही, तर ११ जानेवारीपासून खासगी आयटीआय बंद करून, प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थी आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत, असा इशारा संघटनेने दिला आहे.
खासगी आयटीआयचा बेमुदत बंद
By admin | Published: January 04, 2016 2:40 AM