लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महावितरण व इतर दोन कंपन्यातील रिक्त जागा भराव्यात याकरिता गेली १० वर्षे सतत आंदोलन सुरू असून, सध्या महावितरण कंपनीत २५ हजारवर वर्ग-३ व ४ मधील पदांच्या जागा रिक्त आहेत. शिवाय उर्वरित जागाही रिक्त आहेत. मात्र या जागा भरण्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही. परिणामी ४ जानेवारी रोजी प्रकाशगडसमोर राज्यातील हजारो बेरोजगार विद्युत सहायक भरती तात्काळ करावी म्हणून आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून देण्यात आली.
विद्युत सहायक पदाच्या नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले हजारो उमेदवार नियुक्तीची वाट पाहात आहेत. महापारेषणमध्ये ८५०० नवीन व रिक्त पदे भरणार ही घोषणा झाली आहे. गेली १० वर्षे आकृतिबंध आराखडा मंजूर होऊन लागू होऊ शकला नाही. कधी लागू होईल हे कोणी सांगू शकत नाही. मग ८५०० जागा कशा भरणार, हा प्रश्न आहे. रिक्त जागाच्या कामाचा ताण कार्यरत लाईनस्टॉप व यंत्रचालक वर्गावर येत आहे. २०१४ मध्ये २५०० उपकेंद्र सहायक पदाची जाहिरात निघाली. मात्र ती भरती पुढे रद्द झाली. २०१९ मध्ये विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक ७ हजार पदांची भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
वर्ष होत आले तरी राज्य सरकार व महावितरण कंपनीचे प्रशासन विविध कारणे देत विद्युत सहायक पदाची भरतीची प्रक्रिया पूर्ण करत नाही. पगारवाढ करार करताना तिन्ही कंपनीचे व्यवस्थापनाने प्रत्येक वर्षी टप्प्याने टप्प्याने रिक्त जागा भरण्याचे मान्य केले होते. तो शब्द पूर्ण होताना दिसत नाही, अशी खंत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून व्यक्त करण्यात आली.