सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांची गैरसोय, वाढत्या गर्दीच्या तुलनेत पुरेशा सोयी नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 02:24 AM2017-10-27T02:24:56+5:302017-10-27T02:25:09+5:30
मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी आणि बोरीवली दरम्यान असलेले गोरेगाव हे एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी आणि बोरीवली दरम्यान असलेले गोरेगाव हे एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. गोरेगाव पूर्वेला असलेला आरेचा निसर्गरम्य परिसर, चित्रीकरणासाठी प्रसिद्ध असलेली फिल्मसिटी व फिल्मिस्तान स्टुडिओ, दिंडोशी येथील नागरी निवारा येथे असलेले आयटी पार्क येथे असलेले कारखाने व आयटी हब तसेच पूर्व आणि पश्चिम भागात असलेली मोठी लोकवस्ती यामुळे गोरेगाव स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढतच आहे. मात्र रखडलेली कामे, अपुºया तिकीट खिडक्या, एटीव्हीएम मशीन व पादचारी पूल अशा सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
पूर्वेला स्टेशनच्या बाहेर रस्ता खूप अरुंद आहे. बेस्टच्या बस, कशाही उभ्या केलेल्या रिक्षा, फेरीवाल्यांची गर्दी यामुळे नागरिकांना येथे चालायलाही जागा नसते. २०१५ साली येथील गुरांचा बाजार न्यायालयाच्या आदेशानुसार हटला असला तरी या जागेत बेस्ट डेपो उभारणे प्रस्तावित आहे. मात्र गेली दोन वर्षे सरकारी दिरंगाईत येथील बेस्ट डेपोचा प्रश्न रखडला आहे. या जागेवर डेपो उभारल्यास येथे रस्ता रुंदीकरण करता येईल आणि सकाळी आणि संध्याकाळी होणारी मोठी वाहतूककोंडी दूर होईल. दरम्यान, हार्बरच्या विस्ताराचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्या मार्गावरील गाडी पकडण्यासाठी गोरेगावसह मालाड, कांदिवली आणि बोरीवलीचे प्रवासी गोरेगाव स्थानकात येणार असल्यामुळे इथल्या गर्दीत मोठी वाढ होणार आहे. आता असलेल्या गर्दीचे नियोजन करणेच रेल्वेला जमत नसल्याने अजून वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन कसे केले जाणार, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
पश्चिम रेल्वेने गोरेगाव पश्चिमेपेक्षा पूर्वेकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे येथे सुविधांचा अभाव आहे. फेरीवाले आणि रिक्षा यामुळे नागरिकांना येथे चालताही येत नाही. पूर्वेला सरकत्या जिन्यांची नितांत गरज आहे. १९९९ साली येथील गोरेगाव प्रवासी संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीकृष्ण शिदोरे यांनी चर्चगेटच्या दिशेने असलेला पादचारी पूल रुंदीकरणासाठी आवाज उठवला होता. २००१ ते २००२ साली या पुलाच्या रुंदीकरणासाठी १५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. मात्र अजूनही १९९९ पासून पुलाचे रुंदीकरण झालेले नाही.
- उदय चितळे, अध्यक्ष,
गोरेगाव प्रवासी संघ
२१ सप्टेंबर रोजी रेल्वे समस्येबाबत रेल्वेचे पश्चिम विभागाचे महाव्यवस्थापक यांच्याबरोबर बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. हार्बर रेल्वे रुंदीकरणाचे काम लवकर पूर्ण करून प्रवाशांना सुविधा द्याव्यात. गोरेगाव रेल्वे स्थानक पूर्व ते सिको कंपनीपर्यंत तयार केलेला रस्ता गोरेगाव पोस्ट आॅफिसपर्यंत वाढवल्यास येथील वाहतूककोंडी कमी होईल. गोरेगाव रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ४ आणि ५ वर शौचालय नसल्याने ते उभारण्यात यावे. पूर्वेला एचडीएफसी बँकेजवळ बीओटी तत्त्वावर शौचालय बांधण्यासाठी गेल्या २० एप्रिलला निविदा मागवल्या होत्या. मात्र काम सुरू झाले नाही. पूर्वेला सरकत्या जिन्याची गरज आहे. प्रत्येक फलाटावर वॉटर व्हेंडिंग मशीन आयआरसीटीसीने बसवले पाहिजे. येथील पार्किंगची सुविधा वाढविली पाहिजे. पूर्व आणि पश्चिमेला जास्त तिकीट खिडक्या सुरू करणे गरजेचे आहे.
- गजानन कीर्तिकर,
खासदार, उत्तर पश्चिम मुंबई
येथे हार्बर रेल्वेचे काम सुरू आहे. बांधकामे दूर करण्यासाठी म्हाडा व एमएमआरडीएबरोबर बैठका घेतल्यामुळे हार्बर विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला. बस स्थानक उभारण्यासाठी बेस्टची परवानगी मिळवून दिली. आता महसूल विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर येथील रस्ता रुंदीकरण आणि बस डेपोच्या कामाला सुरुवात होईल. येथे सुसज्ज बस स्थानक व सरकारी कार्यालय लवकर उभारून येथील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानक ते आरे चेक नाका असा पूल करण्याची शिवसेनेची मागणी आहे.
- सुनील प्रभू, आमदार
>वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता तिकीट खिडक्या व एटीव्हीएम मशीनची संख्या खूप कमी असून ती वाढवण्याची गरज आहे. येथे असलेले तिकीट मशीन अनेक वेळा बंद असतात, त्यामुळे रांगा असतात. पूर्वेला बोरीवलीच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाच्या पायºयांची उंची मोठी असल्यामुळे पूल चढायला त्रास होतो. त्यामुळे पुलाची दुरुस्ती करण्याची गरज आहे. - राजश्री मुगुटराव, प्रवासी
>गोरेगाव रेल्वे स्थानकाची रचना पूर्वी नऊ डब्यांची होती. आता सर्व लोकल बारा डब्यांच्या आहेत. त्यामुळे जादा पादचारी पूल उभारण्यात यावेत. जास्त तिकीट खिडक्या सुरू कराव्यात. रेल्वे परिसर फेरीवालामुक्त करताना त्यांची एका ठरावीक ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. - दिलीप पटेल, उपाध्यक्ष, भाजपा, मुंबई
>फेरीवाल्यांचे रेल्वे परिसर व पुलावरील अतिक्रमण, बेशिस्त रिक्षाचालक, भुयारी मार्गात घाण, अतिक्रमण, गुरांच्या बाजारात रात्री उशिरापर्यंत असलेला दारूचा अड्डा, अरुंद पूल, बंद असलेली तिकीट मशीन्स व कमी तिकीट खिडक्यांअभावी प्रवाशांना त्रास होतो. - पराग चुरी, उद्योजक
>रेल्वे स्मार्टकार्डचा प्रचार व प्रसार करत असताना दुसरीकडे स्मार्ट कार्ड तिकीट मशीन्स खूप वेळा बंद असतात. त्यामुळे रांगेत उभे राहून तिकीट घेण्याचा नाहक त्रास स्मार्ट कार्डधारकांना सहन करावा लागतो.
- जयंत विद्वस, प्रवासी
>पादचारी पूल खूप अरुंद आहे. दोन्ही लोकल एकाच वेळी आल्या तर पुलावर प्रचंड गर्दी होते. पूल रुंद करण्यात यावा. गोरेगावच्या मधल्या पुलावर इंडिकेटर नसल्यामुळे वेळापत्रक कळत नाही. त्याची व्यवस्था करण्यात यावी. फलाटांची उंची वाढवणे गरजेचे आहे. शौचालयाची व्यवस्था नाही. पूर्वेला सरकते जिने व लिफ्ट नसल्यामुळे त्रास होतो. स्मार्ट कार्डचे मशीन काम करत नसल्याने स्मार्ट कार्ड असूनही रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागते. - हिना खोपकर, प्रवासी
>गोरेगाववरून चर्चगेटकडे सकाळी ८.१७ ते ८.३७ पर्यंत एकही जलद लोकल नाही. १ आॅक्टोबरपासून ८.३९ ची मालाड लोकल गोरेगाव येथे थांबत नसल्यामुळे खूप गर्दी होते. ८.३७ नंतर ८.४८ ला जलद लोकल आहे. त्यामुळे ९.३० च्या आॅफिस वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे ९.५२ च्या गोरेगाव लोकलऐवजी ती ८.३० ला सुरू करावी. खूप वेळा लोकलच्या आगमनाची घोषणा वेळेवर होत नाही. तर फलाट क्रमांक ४ वर येत असलेल्या लोकल फलाट क्रमांक २ वर येत असल्याची घोषणा होते. त्यामुळे आधीच अरुंद पादचारी पुलावर प्रवासी लोकलची वाट बघत उभे राहतात. - मनाली दीक्षित, प्रवासी
>सूचना, तक्रारी, व्हिडीओ
‘लोकमत’च्या वाचकांच्या ‘मुंबईचा ºहास आता बास’ या मालिकेसंदर्भात काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास
८८४७७४१३०१
या क्रमांकावर कळवाव्या. लोकल स्थानकांच्या तक्रारीही या क्रमांकावर पाठवता येतील. स्थानकांतील समस्यांचे व्हिडीओदेखील वाचक या क्रमांकावर पाठवू शकतात.