मुंबई : मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, कुर्ला व घाटकोपर येथील रहिवाशांच्या उपचारांसाठी अत्यंत सोयीचे असणाऱ्या गोवंडीच्या पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात सोयी-सुविधांचा अभाव आहे. २६ फेब्रुवारीपासून हे रुग्णालय नॉनकोविड रुग्णांच्या उपचारांसाठीदेखील सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. परंतु येथे डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. तसेच रुग्णालयातील अतिदक्षता विभागदेखील बंद आहे. परिणामी येथे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना सायन रुग्णालय व राजावाडी रुग्णालय गाठावे लागत आहे.
सायन-पनवेल मार्ग, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे तसेच घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास त्याला शताब्दी रुग्णालयात आणले जाते. त्याचप्रमाणे रेल्वे अपघातातील व्यक्तीलादेखील या रुग्णालयात आणले जाते. परंतु आता या रुग्णालयात सोयी-सुविधांचा अभाव असल्याने रुग्णास इतर रुग्णालयात घेऊन जावे लागत आहे. मुंबईत आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागले आहे. गोवंडी, मानखुर्द, चेंबूर येथील दाटीवाटीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे हे रुग्णालय सोयीसुविधांनी सुसज्ज असणे गरजेचे आहे.
रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एका खासगी संस्थेला चालविण्यास दिला असून तेथील डॉक्टरदेखील त्यांचेच आहेत. हा विभाग लवकर सुरू व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.