असुविधांचा चौक
By admin | Published: July 11, 2015 10:59 PM2015-07-11T22:59:52+5:302015-07-11T22:59:52+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग ‘ब’ कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्रमांक ३१, सुभाष चौक या प्रभागातील मुरारबाग, रामबाग, परफेक्ट मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या पाठीमागील भागात
- अरविंद म्हात्रे, चिकणघर
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग ‘ब’ कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्रमांक ३१, सुभाष चौक या प्रभागातील मुरारबाग, रामबाग, परफेक्ट मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या पाठीमागील भागात पायवाटा आणि गटारांची दैना उडालेली आहे. थोरे निवासपासून मुरारबाग वसाहतीत जाताना डाव्या बाजूच्या गल्लीची गटारे उघडी आणि तुंबलेली आहेत. थोरे निवासच्या मागे गटारांचे काम अर्धवट झालेले असून त्यावर प्लायवूडचे झाकण आहे. येथून जाणाऱ्या नागरिकाचा पाय चुकून घसरला तर अपघाताची शक्यता आहे. पायवाटा आणि गटारांची कामे ठेकेदारांमार्फत झाल्यानंतर मनपा अधिकारी आणि नगरसेवकाचे काम बरोबर झाले की नाही, याकडे लक्ष नसल्याचे यावरून स्पष्ट होते. स्लम भाग बराचसा या प्रभागात येत असून त्यातील नागरिक असुविधांनी ग्रस्त आहेत.
याचबरोबर मुरारबाग ते वखारीजवळून छाया टॉकीजकडे जाताना डाव्या बाजूचे गटार ठिकठिकाणी उद्ध्वस्त झाले आहे. गोपाळ टिंबर मार्टजवळील विजेच्या रोहित्रासाठीच्या फाउंडेशनखाली गटाराचे खोदकाम झाले आहे. यामुळे रोहित्राचा कट्टा कोसळण्याची शक्यता आहे. येथून कदम निवास, सातीआसरा मंदिरलगतचे गटारही नादुरुस्त झाले आहे. यामुळे दुर्गंधीचा सामना वाटसरू आणि नागरिकांना करावा लागतो. नगरसेवक आणि मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. अशीच अवस्था छाया टॉकीज (प्रभाग ३१ च्या हद्दीपासून) ते सुभाष चौक या मुख्य रस्त्याची असून डाव्या बाजूला सफाई नसल्याने बऱ्याच जागी चिखल आहे. येथून जुने दत्त मंदिर परिसरात जाण्यास पायवाट नाही (बेकरीच्या मागील भाग). येथून पुन्हा मुरारबागेत जाताना गल्लीगल्लींतील पायवाटा अरुंद आहेत. यामुळे दुचाकी वाहनही जाऊ शकत नाही.
अगदीच गच्च घरे असल्याने गटारे बंदिस्त होणे गरजेचे आहे. ते न झाल्यास नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येईल. त्यातच आता पावसाळा असल्याने अस्वच्छतेचे परिणाम नागरिकांनाच भोगावे लागतील.
रामबाग गल्ली नंबर ३ मध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला गटार तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावरच साठते. याच गल्लीसमोरील वखारीशेजारची कचराकुंडी भरून वाहते. बाजूलाच आजूबाजूच्या घर दुरुस्तीनंतर रॅबिट बऱ्याच दिवसांपासून तिथेच आहे. या प्रभागात मधुरिमा स्वीटपासून आॅल्टी हॉटेल ते कल्याण जनता सहकारी बँकेकडून म्हसकर हॉस्पिटलमार्गे शासकीय विश्रामगृहालगतच्या गल्लीतील डाव्या बाजूने लुड्स स्कूलपासून पुन्हा मधुरिमा असे एक पॉकेट असून यात गल्ली नंबर ४ चा काही भाग, गल्ली नं. ५ , ६ आणि राजा हॉटेल परिसर, पै कॉलनीपर्यंत तर रामबाग ४, गोपाळ टिंबर मार्ट, कदम हाऊस, ब्रेक्समन चाळीजवळून परफेक्ट ड्रायव्हिंग स्कूल, हनुमान मंदिरापासून पुन्हा म्हसकर हॉस्पिटल, दत्त मंदिर परिसर, परळीकर वखार गल्ली, रामबाग गल्ली ३, गल्ली २ चा काही भाग, असा मोठा परिसर आहे. प्रभागात बऱ्याच जागी अस्वच्छता आहे. गटारे नादुरुस्त असून कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे दिसून आले. मुरबाड रोड हा मुख्य रस्ता या प्रभागात असून सुभाष चौक आणि डॉ. म्हसकर हॉस्पिटल चौकात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यामुळे मुख्य रस्ता अनेक वेळा वाहतूककोंडीने जॅम होतो. एवढ्या समस्या असताना या प्रभागाचे नगरसेवक करतात काय आणि मनपा अधिकाऱ्यांची काहीच जबाबदारी नाही का, असे प्रश्न निर्माण होतो.