मतदान केंद्रांवरील गैरसोयींचा फटका लोकप्रतिनिधींना
By रेश्मा शिवडेकर | Published: May 20, 2024 06:01 PM2024-05-20T18:01:58+5:302024-05-20T18:02:03+5:30
मतदारांना उन्हात उभे राहावे लागू नये म्हणून शेड बांधली होती.
मुंबई : पंखे, पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करणाऱ्या शेडचा अभाव अशा गैरसोयीच्या वातावरणात सोमवारी मतदारांना मतदानाचा अधिकार बजावावा लागला. काही ठिकाणी याचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसला. मागाठाणे येथील शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे मतदान केंद्र बोरीवली पश्चिमेला एमएचबी कॉलनी येथील सायली कॉलेजमध्ये होते. परंतु, या केंद्रावर पुरेसे पंखेच नव्हते. त्यामुळे मतदारांसह कर्मचाऱ्यांनाही प्रचंड उकाड्याला तोंड द्यावे लागत होते. अखेर एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पेडिस्टल पंखे बसविण्यात आले.
मतदारांना उन्हात उभे राहावे लागू नये म्हणून शेड बांधली होती. परंतु, त्यामुळे उन्हापासून बचाव होत नव्हता. प्रत्यक्ष मतदान केंद्रेही अशा पद्धतीने बंदीस्त करून टाकली होती,की हवा खेळती राहायला वाव नव्हता. अशा परिस्थितीत तासनतास रांगेत उभे राहून मतदारांनी मतदानाचा हक्क तरी कसा बजावायचा, अशी तक्रार प्रकाश सुर्वे यांनी केली. त्यात मतदानासाठी खूप वेळ लागत होता. आपल्याला पाऊण तास रांगेत उभे राहावे लागले, अशी माहिती त्यांनी दिली.