विजय केंकरे, दिग्दर्शक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठी रंगभूमीला जेव्हा हक्काचे नाट्यगृह नव्हते तेव्हा डॉ. अमृत भालेराव यांनी साहित्य संघ हे ओपन एअर थिएटर सुरू केले. दि. ६ एप्रिल १९६४ रोजी नवीन मुंबई मराठी साहित्य संघ मंदिराचे उद्घाटन झाले. त्या काळी हा साहित्य आणि नाटकांचा अड्डा होता. सभागृहासोबतच भालचंद्र पेंढारकरांचा रेकॉर्डिंग स्टुडिओ, क्लास रूम्स, ड्रामा स्कूल, नाट्य शाखा, साहित्य शाखा, वाचनालय, छोटे पुरंदरे सभागृह असल्याने संकुलाची संकल्पना इथे विचारपूर्वक राबवली गेली आहे. इतिहासाची साक्ष देत उभे असलेल्या या नाट्यगृहात नेपथ्याचे साहित्य नेताना मात्र रंगकर्मींना त्रास होतो.
प्रेक्षक आणि रंगमंचामधील अंतर कमी असल्याने प्रयोगातील रंगत वाढते हे या नाट्यगृहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. इथे पूर्वी आसनव्यवस्था चांगली होती. मध्यंतरी खूप खराब झाली होती. आजही तितक्याशा चांगल्या स्थितीत नाही. मेकअप रूमवर असल्याने कमी वेळात प्रवेश असल्यास घाईघाईत पायऱ्या चढून व धडाधड उतरून रंगमंचावर पोहोचावे लागते. याचा कलाकारांना त्रास होतो. विंगेतील जागा अपुरी पडते. स्वच्छतागृहे आधुनिक नसली तरी बऱ्यापैकी स्वच्छ असतात. लेडीज मेकअप रूमला लागून स्वच्छतागृह नसल्याने स्त्री कलाकारांची गैरसोय होते.
इथे गाडी नेता येत नाही. ठराविक अंतरापर्यंत नाटकाची बस, टेम्पो गेल्यावर हातगाडीवरून सामान न्यावे लागते. आज कुटुंबासोबत नाटक बघायला जायचे असल्यास कोणीही गाडी घेऊन जाण्याला प्राधान्य देतो. पार्किंगची सोयच नसल्यानेही प्रेक्षकांनी या नाट्यगृहाकडे पाठ फिरवली आहे. पार्किंगच्या गैरसोयीमुळे भविष्यात इथे नाटकांचे प्रयोग होणे कठीण आहे. बाजूचा रस्ता मोठा झाल्यास पुन्हा संघामध्ये नाटकांचा बहर येईल.
जे कलावंत मेहनतीने बसवलेल्या नाटकातून आपल्याला वेगळी अनुभूती देतात. त्यांना नाट्यगृहात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नाट्यगृहाविषयीच्या विधायक सूचना त्यांनी केल्या आहेत. मान्यवर कलावंत आपल्यासमोर त्यांची भूमिका मांडत आहेत. मराठी साहित्य संघ मंदिर नाट्यगृहाविषयी प्रख्यात दिग्दर्शक विजय केंकरे आपल्या भेटीला आले आहेत. आपणही 8108899877 या नंबरवरच्या व्हॉट्सॲपवर आपली प्रतिक्रिया देऊ शकता.
मर्यादित कार्यक्रमांसाठी नाट्यगृह वापरले जाईल
इथे येणारा प्रेक्षक ट्रेनने प्रवास करणारा होता. परिस्थिती जशी बदलली तसा नाटकवाल्यांचा संघाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत गेला आणि हळूहळू नाटके कमी झाली. गिरगावातील मराठी माणसांची संख्या कमी झाली असला तरी इतर कार्यक्रम होतात. भविष्यात कदाचित मर्यादित कार्यक्रमांसाठी हे नाट्यगृह वापरले जाऊ शकेल, पण त्यामुळे याचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. इरावती कर्णिक प्रमुख असलेले इथले ड्रामा स्कूल आजही पुढची पिढी घडविण्याचे काम करत आहे.
प्रेक्षकांच्या बोलक्या प्रतिक्रिया...
नाटकांची संख्या कमी झाली असली तरी वाचनालयापासून ड्रामा स्कूलपर्यंत बरेच उपक्रम सुरू असल्याने दामोदर हॉलप्रमाणे साहित्य संघ तोडण्याचा विचार कोणी करू नये. खुर्च्या तसेच स्वच्छमागृहांमध्ये सुधारणा करण्याची नितांत गरज आहे. या नाट्यगृहाने कात टाकल्यास कदाचित प्रेक्षकांचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.