पोलीस वसाहतीत गैरसोयी

By admin | Published: March 10, 2016 02:31 AM2016-03-10T02:31:19+5:302016-03-10T02:31:19+5:30

वडाळ्यातील रफी अहमद किडवाई मार्ग वसाहतीत सध्या मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव आहे. पाणी, अस्वच्छता आणि इमारतीची दुरवस्था अशा अनेक समस्या येथील पोलीस कुटुंबीयांना भेडसावत आहेत

Inconvenient in the police colony | पोलीस वसाहतीत गैरसोयी

पोलीस वसाहतीत गैरसोयी

Next

मुंबई : वडाळ्यातील रफी अहमद किडवाई मार्ग वसाहतीत सध्या मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव आहे. पाणी, अस्वच्छता आणि इमारतीची दुरवस्था अशा अनेक समस्या येथील पोलीस कुटुंबीयांना भेडसावत आहेत. त्यामुळे शासनाने येत्या आठ दिवसांत या समस्यांवर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील पोलीस अधिकांऱ्याच्या कुटुंबीयांनी दिला आहे. या आंदोलनासाठी महिला पुढाकार घेणार आहेत.
२०१० मध्ये म्हाडाने रफी अहमद किडवाई पोलीस ठाण्याच्या बाजूला या दोन इमारती बांधल्या. त्यानंतर २०११मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने यातील १०८ रूम ताब्यात घेऊन ते पोलीस अधिकाऱ्यांना दिले. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आरएके मार्ग पोलीस ठाणेदेखील आहे. मात्र कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचा माल इमारतीच्या बांधकामाला वापरल्याने पाच वर्षांतच या इमारतींची पूर्णपणे दुरवस्था झाली. अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. सांडपाण्याचे पाइप फुटून पाणी वाहत आहे. सातव्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबीयांना तर पावसाळ्यात छत गळण्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याच्या मोटार वारंवार खराब होत असल्याने मोठा मनस्ताप महिलांना सहन करावा लागतो. कंत्राटदाराने पाण्याच्या टाक्याही अगदीच छोट्या बनवल्याने कोणालाही पुरेसे पाणी मिळत नाही. याबाबत येथील अधिकारी वर्गाने अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून या समस्यांवर तोडगा काढण्याची विनंती केलेली आहे. मात्र अद्यापही काहीही तोडगा निघालेला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Inconvenient in the police colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.