- मनोहर कुंभेजकरमुंबई - मुंबई शहरात जवळपास 249 महिला संस्था,महिला बचतगट,महिला मंडळे पोषण आहार शिजवण्याचे काम करतात.एका बचतगटांमध्ये कमीतकमी 10 महिला काम करतात.महिला बचतगटांच्या माध्यमातून जवळपास 2490 महिला आपला उदरनिर्वाह करतात.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वितरित करणाऱ्या आहाराच्या कंत्राटाची कार्यपद्धती चुकीची आहे.या परिपत्रकातील जाचक अटीनुसार बचत गटांना मिळणारी देयके थेट त्यांच्या खात्यात जमा न होता शाळेच्या बँक खात्यात जमा होत असल्याने मुंबईतील 249 बचतगटांवर उपासमारीची पाळी आली आहे.सदर परिपत्रकातील विविध जाचक अटींमुळे महिला बचत गट,महिला मंडळे व महिला संस्था यांच्यावर बेकारीची व कर्जबाजाराची वेळ आली आहे.
त्यामुळे महिला बचत गटांवर होणारा अन्याय दूर होण्यासाठी जातीने लक्ष घालून सदर परिपत्रक रद्ध करावे व महिलांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 4 च्या नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद,माजी महापौर सुनील प्रभू व आमदार-विभागप्रमुख विलास पोतनीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केला आहे.
शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्याकडून जा. क्र.प्राशिसं/ शापोआ/केंद्रस्वयंपाक गृह/ईओआय/2019/1522 नुसार अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेने शाळा स्तरावर पुरवठा केलेल्या आहाराच्या वजनानुसार आदा करण्यात यावीत असे परिपत्रक काढले आहे.या परिपत्रकानुसार सदर देयके शाळेतील मुख्याध्यापकाने लाभार्थी संस्थेनुसार परिशिष्ट 'अ' विहित नमुन्यात प्रपत्र तयार करून स्वाक्षरी करून महानगरपालिका कार्यालयास सादर करणे,सदर देयके अदा करण्याकरीता परिशिष्ट 'ब' विहीत नमुन्यामध्ये प्रपत्र स्वाक्षरी करून सादर करणे असे निर्देश दिले आहेत परंतू याबातची देयके असे नगरसेविका पाटेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
याबातची देयके खरे तर अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेने(संस्थेने) करायची असतात,मात्र द.गो.जगताप शिक्षण संचालक(प्राथमिक) यांनी शालेय पोषण आहाराची देय तयार करणे, सदर पोषण आहाराच्या देयकानुसार शाळांच्या खात्यावर देयके जमा करण्याची कामे आदी कामेसुद्धा शिक्षकांवर,मुख्याध्यापकांवर लादली असल्याचा आरोप नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी लोकमतशी बोलतांना केला.अन्न (पुरवठा) शिजवणाऱ्या संस्था या कंत्राटदार असल्याने पोषण आहाराची देय रक्कम देयकानुसार शाळांच्या खात्यावर जमा न करता पूर्वी प्रमाणेच महिला संस्थांच्या चालकांच्या खात्यात आहाराची देयके जमा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
या परिपत्रकात इयत्ता 1 ली ते 5 वी मधील विद्यार्थ्यांना 400 ते 500 ग्रॅम, इयत्ता 6 वी व 7 वी च्या विद्यार्थाना 700 ते 750 ग्रॅम वजना इतका आहार देण्याचे सुस्पष्ट निर्देश आहेत.मात्र 1 ली ते 5 वी मधील विद्यार्थी 400 ते 450 ग्रॅम इतका आहार खाऊ शकत नाही. त्यामुळे अन्नाची नासाडी होऊन आहार वाया जातो याकडे देखिल सुजाता पाटेकर यांनी शेवटी लक्ष वेधले आहे.