प्रवासी वापरास अयोग्य एक हजार एसटींचा वापर आता मालवाहतुकीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 05:41 AM2018-09-20T05:41:42+5:302018-09-20T05:42:15+5:30

‘रोडमॅप’ तयार; तोटा कमी करण्याकरिता महामंडळाचे पाऊल

Incorrect one thousand STs can be used for passenger use now | प्रवासी वापरास अयोग्य एक हजार एसटींचा वापर आता मालवाहतुकीसाठी

प्रवासी वापरास अयोग्य एक हजार एसटींचा वापर आता मालवाहतुकीसाठी

Next

- महेश चेमटे 

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) तोटा कमी करण्यासाठी प्रवासी वापरास अयोग्य असलेल्या एक हजार एसटींचे रूपांतर ट्रकमध्ये करून मालवाहतुकीस सुरुवात करणार आहे. त्यासाठी महामंडळाच्या राज्यातील तब्बल दीड लाख चौरस मीटरच्या जागेवर ‘गोडाउन’ उभारण्यात येतील. मालवाहतुकीसाठीचा ‘रोडमॅप’ तयार असून, या संदर्भात येत्या ४५ दिवसांत निविदा मागविण्यात येतील.
सात वर्षे पूर्ण झालेल्या एसटींचे मालवाहतुकीच्या ट्रकमध्ये रूपांतर करण्यात येईल. त्याची बांधणी महामंडळाच्या कार्यशाळेत होईल. मालवाहतुकीस मिळणाऱ्या प्रतिसादानंतर आवश्यकता भासल्यास, भाडेतत्त्वावरील वाहनांचाही एसटीच्या मालवाहतुकीत समावेश करण्यात येईल. सुरुवातीला एक हजार ट्रकने मालवाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.
मालवाहतुकीसाठी आवश्यक असणारे गोडाउन उभे करण्यासाठी आवश्यक असलेल्या मोकळ्या, तसेच मोक्याच्या जागा महामंडळाकडे आहेत. एका गोडाउनची क्षमता किमान ५ टन असेल. जागा निश्चित करण्यात आल्या असून, येत्या ४५ दिवसांत मालवाहतुकीसंदर्भात निविदा मागविण्यात येतील.
मालवाहतुकीसाठी आवश्यक साठवणुकीच्या जागा आणि ट्रक ही महामंडळाची मोठी बलस्थाने आहेत. मात्र, मालवाहतूक सुरू झाल्यानंतर यावर नियंत्रण आणि देखभाल महामंडळाचे असणार की अन्य यंत्रणांचे, यावरच या नव्या प्रयोगाचे यश अवलंबून असल्याचे मत, एसटीतील महाव्यवस्थापक दर्जाचे अधिकारी व्यक्त करत आहेत.

बैठकीत मंजुरी
कायद्यानुसार एसटी महामंडळाला प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी परवानगी आहे. यानुसार, मालवाहतूक सुरू करण्यास महामंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटीच्या मालवाहतुकीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे स्वागत केले आहे. येत्या दीड महिन्यांत मालवाहतुकीबाबत निविदा मागविण्यात येतील.
- दिवाकर रावते,
परिवहनमंत्री आणि अध्यक्ष, एसटी महामंडळ

उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र यंत्रणा
मालवाहतुकीसाठी एसटी महामंडळ उपाध्यक्षांच्या देखरेखीखाली स्वतंत्र यंत्रणा उभारेल. नियंत्रण, देखभाल व अन्य जबाबदारी या यंत्रणेकडे असेल.

Web Title: Incorrect one thousand STs can be used for passenger use now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.