पायलटची चुकीची ड्युटी लावली; एअर इंडियाला ९९ लाखांचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 06:23 AM2024-08-24T06:23:34+5:302024-08-24T06:25:02+5:30
९ जुलै २०२४ रोजी मुंबई ते रियाध विमान या विमानात एका प्रशिक्षणार्थी वैमानिक आणि प्रशिक्षक वैमानिक यांची ड्युटी अपेक्षित होती.
मुंबई : मुंबई ते रियाध दरम्यान एअर इंडिया कंपनीच्या विमानातील वैमानिकांची चुकीची ड्युटी लावल्या प्रकरणाची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी एअर इंडिया कंपनीला ९९ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी चुकीची ड्युटी लावल्याप्रकरणी ९० लाख रुपयांचा दंड तर याखेरीज ऑपरेशन विभागाचे संचालक यांना ६ लाख रुपयांचा आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक यांना ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एकूण ९९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
९ जुलै २०२४ रोजी मुंबई ते रियाध विमान या विमानात एका प्रशिक्षणार्थी वैमानिक आणि प्रशिक्षक वैमानिक यांची ड्युटी अपेक्षित होती. प्रशिक्षक वैमानिकाच्या निरीक्षणाखाली प्रशिक्षणार्थी वैमानिकाने विमान चालवणे अपेक्षित होते. रियाध येथे उतरल्यानंतर प्रशिक्षक वैमानिकाने प्रशिक्षणार्थी वैमानिकाच्या ‘सुपरव्हाईजड् लाईन फ्लाईंग’ या फॉर्मवर सही करणे अपेक्षित होते.
मात्र, विमान रियाध येथे दाखल झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी वैमानिकासोबत असलेल्या कॅप्टनने आपण प्रशिक्षक वैमानिक नसल्याचे सांगितल्यावर हा घोटाळा उजेडात आला. हे लक्षात आल्यानंतर या दोन्ही वैमानिकांनी स्वतःहून या घटनेच्या अहवालाची नोंद केली होती. कंपनीचे वेळापत्रक लावणाऱ्या व्यवस्थेत चूक झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे दिसून आले. त्यानंतर कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली होती.