मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या हंगामी कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे अस्थायी सुरक्षारक्षकांचा भत्ता हाही आहे. २०१४ सालापासून मुंबई विद्यापीठातील सुरक्षारक्षक आपल्या १४ रुपये प्रति तास या भत्त्यात वाढ करावी यासाठी पाठपुरावा करीत आहेत.शेवटी या भत्त्यात मुंबई विद्यापीठाकडून वाढ करण्यात आली असून तो ४० रुपये प्रति तास करण्यात आला़ अद्याप तो अंमलात आला नाही. त्यामुळे इतकी वर्षे विद्यापीठ प्रशासनाच्या मंजुरीसाठी अडकलेला सुरक्षारक्षकांचा भत्ता विद्यापीठ प्रशासनाच्या लाल फितीत अजून किती दिवस अडकणार, असा प्रश्न विद्यापीठातील अस्थायी सुरक्षारक्षकांना पडला आहे.मुंबई विद्यापीठातील बहुतांश सुरक्षारक्षक तात्पुरत्या सेवेत आहेत. सुरक्षारक्षकांना आठ तासांची सेवा पार पाडावी लागते.काही वेळेस एखादा सुरक्षारक्षक गैरहजर राहिल्यास त्याची पुढील आठ तासांची सेवाही आधीच्या सुरक्षारक्षकाला करावी लागते. अनेकदा एखादा सुरक्षारक्षक ३२ ते ४० तास काम करतो. पण, सलगपणे इतके तास सेवा करूनही मिळणारा मोबदला अत्यंत तुटपुंजा म्हणजे १४ रुपये प्रति तास इतकाच होता. यात वाढ व्हावी म्हणून गेली ६ वर्षे सातत्याने सिनेट सदस्य आणि सुरक्षारक्षकांकडून याचा पाठपुरावा केला जात आहे. अस्थायी सुरक्षारक्षकांची विद्यापीठातील संख्या १४८ असून त्यातील १८ सुरक्षारक्षक या महिलाही आहेत. त्यामुळे या तुटपुंज्या भत्त्याचा काहीच लाभ त्यांना मिळत नव्हता. अखेर २३ आॅक्टोबरच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि अस्थायी सुरक्षारक्षकांना मिळणा-या अतिकालिक भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.हा प्रस्ताव लाल फितीत अडकला असून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या निर्णयावर विद्यापीठ प्रशासनाच्या लेखा व वित्त विभागाची कार्यवाही बाकी असून अजून या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. आम्ही याची अंमलबजावणी लवकर अपेक्षित असल्याची आशा ठेवून असल्याचे सुरक्षा अधिकारी सांगत आहेत.या विषयाचा पाठपुरावा २०१४ पासून सुरू असून या वेळी पुन्हा सिनेट बैठकीत हा मुद्दा घेण्यात आला होता. जे सुरक्षा अधिकारी विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी झटत असतात, त्यांची सुरक्षाच वा-यावर असेल तर विद्यापीठ तरी सुरक्षित कसे राहील? विद्यापीठाच्या निर्णयाची विद्यापीठाने लवकर अंमलबजावणी करून तो केवळ कागदोपत्री ठेवू नये आणि सुरक्षारक्षकांना दिलासा द्यावा.- सुधाकर तांबोळी,सिनेट सदस्य
विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांच्या भत्त्यात वाढ, अद्याप सरकार दप्तरीच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 2:53 AM