मुंबईत रुग्णवाहिकांच्या नोंदणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:06 AM2021-04-19T04:06:43+5:302021-04-19T04:06:43+5:30
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता दिवसागणिक काळजात धडकी भरवणारी ठरत आहे. मागील काही दिवसांत शहर उपनगरातील रस्त्यांवर रुग्णवाहिकांच्या ...
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता दिवसागणिक काळजात धडकी भरवणारी ठरत आहे. मागील काही दिवसांत शहर उपनगरातील रस्त्यांवर रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज वाढला आहे, तर रुग्णवाहिकांसाठीच्या नोंदणीतही वाढ झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने १० एप्रिलपासून ४४७ रुग्णवाहिका आणि ३५ शववाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागात सरासरी १९ रुग्णाहिका व शवाहिका उपलब्ध आहेत. या सर्व रुग्णवाहिका सर्व रुग्णालय, कोविड सेंटर आणि विभाग कार्यालयांची गरज लक्षात घेऊन तैनात करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सरकारच्या १०८ क्रमांकाच्या ९३ रुग्णवाहिका सध्या उपलब्ध आहेत. जानेवारीपासून ते मार्च महिन्यांपर्यंत ५ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांना सेवा दिली आहे, तर २१ हजारांहून अधिक नाॅनकोविड रुग्णांना सेवा दिली आहे. रुग्णवाहिका चालक संघटनेचे सदस्य असलेल्या ज्ञानदेव गावडे यांनी सांगितले, सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याने दिवसाला एक वाहक साधारणत ३-४ रुग्णांची सेवा करत आहे. मात्र रुग्णांसाठीची रुग्णवाहिकांची मागणी आणि सध्या असलेले मनुष्यबळ यांचा समतोल नसल्याचे अजूनही दिसून येत आहे.
प्रत्येक कोविड सेंटर, रुग्णालय आणि विभाग कार्यालयाला आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका तसेच शववाहिका उपलब्ध्य करून दिल्या आहेत. ज्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कोविडमध्ये रुग्णवाहिका व शववाहिका यांच्याअभावी रुग्णांच्या नातेवाइकांची परवड होऊ नये, असा विचार आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत रुग्णवाहिका व शववाहिका पुन्हा पूर्णक्षमतेने रुग्णवाहिकांची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, वाॅर रुमकडे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासंदर्भातली जबाबदारीही देण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले.
उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका
१०८ क्रमांकाच्या : ४२
महापालिका : ४८
परिवहन आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या : ३२३
बेस्टकडून प्राप्त झालेल्या : ३१
१०८ च्या रुग्णवाहिकांनी दिली सेवा
मुंबई कोरोना रुग्ण नाॅनकोविड रुग्ण
जानेवारी ९०० ४,५०६
फेब्रुवारी १,४६७ ११,२२१
मार्च ३,००१ ६,०३५
एकूण ५,३६८ २१,७६२