मुंबईत रक्तक्षयाच्या रुग्णांत वाढ, पुण्यातील प्रमाण सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 05:27 AM2018-05-28T05:27:26+5:302018-05-28T10:52:45+5:30
हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्तक्षय, म्हणजेच अॅनिमियासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. यामुळे पेशींना मिळणारा आॅक्सिजन कमी होतो आणि अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो.
मुंबई - हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्तक्षय, म्हणजेच अॅनिमियासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. यामुळे पेशींना मिळणारा आॅक्सिजन कमी होतो आणि अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो. राज्यातील आकडेवारी पाहता, मुंबईत रक्ताक्षयाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, पुण्यातील प्रमाण सर्वाधिक आहे.
गेल्या काही वर्षांत बदललेल्या जीवनशैली आणि आहारामुळे या आजाराचे प्रमाण वाढते आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळात राज्यभरात ७८ हजार १४३ रुग्ण आढळून आले. त्यात पुण्यात सर्वाधिक म्हणजे ८ हजार ४३५ रुग्णांची नोंद झाली, तर त्या खालोखाल मुंबईत ६ हजार ९२४ रुग्णांना हा आजार असल्याचे दिसून आले आहे.
राज्यात आढळलेल्या रुग्णांपैकी शासकीय रुग्णालयांमध्ये ७० हजार ९०२ रुग्ण, तर खासगी रुग्णालयांत ७ हजार २४१ रुग्णांची नोंद झाली. मुंबई शहर-उपनगरांत ६ हजार ८०२ रुग्ण सरकारी रुग्णालयांत दिसून आले, तर १२२ रुग्ण खासगी रुग्णालयांतील आहेत. एप्रिल २०१८ या महिन्यात राज्यात ३ हजार २८९ रुग्ण, तर मुंबईत ८२२ रुग्णांची नोंद करण्यात आली. देशभरात या आजाराचे प्रमाण पाहता, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजेच २ लाख ७४८ रुग्ण आढळून आले. त्यानंतर, मध्य प्रदेश ९१ हजार ६७५ रुग्ण, तेलंगणात ८० हजार २१७ रुग्णांना हा आजार असल्याचे निदान झाले. महाराष्ट्र या क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे. ६ महिने ते ५ वर्षे या वयोगटातील लहान मुलांमध्ये हा आजार असण्याचे प्रमाण ग्रामीण भागात ५४.० टक्के, तर शहरी भागात ५३.६ टक्के आहे. गरोदर महिलांमध्ये अॅनिमिया असल्याचे ग्रामीण भागातील प्रमाण ४९.९ टक्के, तर शहरी भागात प्रमाण ४८.५ टक्के आहे.
याविषयी डॉ. आनंद बानी यांनी सांगितले की, जेव्हा अशक्तपण येतो, तेव्हा रक्तातील लाल पेशींचे प्रमाण कमी होते. परिणामी, थकवा जाणवणे, अशक्तपण येणे, श्वास घेताना त्रास होणे आणि शरीरातील ताकद कमी होणे आदी लक्षणे दिसतात.
अशक्तपणा, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न होणे, पायात गोळे येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, त्वचा पांढरी पडणे
उपाययोजना
- आहारातील लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी लोहयुक्त पदार्थांना पसंती द्या.
- ‘क ’जीवनसत्त्वाचे आहारातील प्रमाण वाढवा.
- शक्य असल्यास मासे, चिकन व मटण यांचा आहारात समावेश करा.
- अतिप्रमाणात चहा व कॉफी घेणे टाळावे, तसेच ही दोन्ही पेये जेवणानंतर किंवा जेवणाबरोबर घेऊ नयेत.